A rift in the Maha Vikas Aghadi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षात जागा वाटपप्रश्नी बैठकांवर बैठका होत आहेत. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
त्यात आता वंचित बहुजन विकास आघाडीलाही सोबत घेण्याचे कॉंग्रेसने ठरविले आहे. मात्र वंचितनेही अधिक जागांचा आग्रह धरल्याने हे जागा वाटप रखडले आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आघाडीबाबतचे धोरण ठरलेले नाही. काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि ठाकरे सेनेत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे.
तसेच काँग्रेसच्या वंचित आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबतही वाटाघाटी सुरू आहेत. मात्र वंचित आघाडी, ठाकरे सेना, काँग्रेसने सर्वांना अधिक जागा हव्या आहेत. वंचितने कॉंग्रेसकडे पन्नासहून अधिक जागांची मागणी केली आहे. तिकडे ठाकरे सेना किमान ६५ जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहे. त्यामुळे महाविकास आघाडी होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. सर्वच पक्ष आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे आतापर्यंत चार ते पाच बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही.
ठाकरे सेनेचे एबी फॉर्म आले
ठाकरे सेनेने शहरातील ९० जागांवर उमेदवार देण्याची आपली तयारी असल्याचे आधीच सांगितले आहे. त्यात ठाकरे सेनेने आपल्या उमेदवारांसाठी एबी फॉर्मही पाठवून दिले आहेत. सोमवारी महाविकास आघाडीबाबत निर्णय न झाल्यास ठाकरे सेनेकडून बहुतांश जागांवर एबी फॉर्मचे वाटप होईल, असे सूत्रांनी सांगितले.
उमेदवारांकडून आघाडीसाठी दबाव
बैठकीत जागांचे गणित जुळत नसल्याने काही दिवसांपासून ठाकरे सेना आणि काँग्रेसमधील चर्चा थांबली होती. परंतु इच्छुक उमेदवारांकडूनच आता आघाडीसाठी आपापल्या पक्षांवर दबाव टाकला जात आहे. यावेळची निवडणूक प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे प्रभागाची व्याप्ती मोठी असल्याने खर्चही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे इच्छुक उमेदवार एकत्रित ताकदीने निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.