

Shock to Congress! Govind Yadav resigns from the post of Taluka President and also from party membership.
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील असंतोष उफाळून आला, वरिष्ठांनी पाठ फिरविल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा जाहीर राजीनामा दिला. निवडणुकीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून पक्षाने स्वतःच आपले नुकसान करून घेतले, असा थेट हल्लाबोल यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.
निवडणुकी दरम्यान जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबाजानी दुर्राणी तसेच जिल्ह्यातील माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे न राहता त्यांचे खच्चीकरण केल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला. कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले, मात्र वरिष्ठांनी पाठ फिरविल्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
पालिका निवडणुकीत असे वागणूक दिली जाते, तर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरवशावर काम करायचे? असा सवाल उपस्थित करत यादव यांनी पक्षाच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली.
कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होत असल्यानेच आपण हा टोकाचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या राजीनाम्यामुळे तालुक्यातील काँग्रेस संघटनात्मक अपयश उघड झाले, पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. यावेळी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दत्ता भिसे यांनीही राजीनामा देत असंतोषात भर घातली. पत्रकार परिषदेस सुपरगावचे उपसरपंच लक्ष्मण घोलप, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बालाजी यादव, सखाराम बोबडे, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.