A rickshaw driver was brutally murdered by a gang on a busy road.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या वादातून रिक्षाचालकाची कारमधून आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळीने भररस्त्यात कोयत्याने घाव घालून निघृण हत्या केली. ही थरारक घटना बुधवारी (दि.१) रात्री आठ ते मृत सय्यद इमरान साडेआठ वाजेदरम्यान सिल्कमिल कॉलनी रस्त्यावर घडली. सय्यद इमरान सय्यद शकील (३८, रा. सादातनगर) असे हत्या झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रिक्षाचालक इमरान हे त्यांचा आठ वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीला घेऊन घराकडे निघाले होते. सिल्कमिल कॉलनीजवळ मुख्य रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली एका कारमधून अज्ञात चार ते पाच जणांचे टोळके आले.
त्यांनी रिक्षासमोर कार आडवी लावून इमरान यांच्यावर काही कळण्याच्या आत कोयते, धारदार शस्त्राने हल्ला चढविला. रिक्षातच त्यांच्यावर कोयत्याचा घाव घातला तो वार हातावर झेलल्याने बोटे तुटून पडली. दुसरा घाव डोक्याच्या खाली पाठीमागून मानेवर केल्याने इमरान रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. आरोपींनी कारमधून धूम ठोकली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हत्येचा थरार घडल्याने परिसरात मोठा जमाव जमला. सातारा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, एपीआय देशमुख, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, उपनिरीक्षक राख यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमरान याना तात्कळ घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनास्थळी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी धाव घेत पाहणी केली. उड्नणपुलाच्या खाली आणि वर दोन्ही ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यांना आवरताना पोलिसांची दमछाक उडाली. राखीव पोलिस दलाची तुकडी पाचारण करण्यात आली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत इमरान आणि संशयित मुजीब डॉन यांच्यात चार महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यातूनच इमरानची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्यासह अन्य पथके मारेकऱ्यांच्या शोधात रवाना झाली आहेत.