Shri Balaji Rath : आज सीमोल्लंघन, कर्णपुरा येथे जय्यत तयारी
Chhatrapati Sambhajinagar Shri Balaji Rath Preparations for at Karnapura
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा विजयादशमीनिमित्त आज गुरुवारी (दि. २) येथील कर्णपुरा मंदिर परिसरात दरवर्षीच्या परंपरेनुसार श्री बालाजी रथ ओढून उत्साहपूर्ण वातावरणात सीमोल्लंघन केले जाणार आहे. यावेळी दर्शनासाठी नेहमीप्रमाणेच भाविकांची अलोट गर्दी उसळणार असल्याने मंदिर विश्वस्तांनी जय्यत तयारी केली आहे.
सांयकाळी श्री बालाजी मंदिरात महाआरतीनंतर : गोविंदा.. गोविंदा.. च्या जयघोषात रथ यात्रा निघणार आहे. शहराचे ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्ताने दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली. अगदी पहिल्या माळेपासून सलग नऊ दिवस भल्या पहाटे पासून ते रात्री उशिरापर्यंत दररोज हजारो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले.
पावसातही भक्तांची उत्स्फूर्त गर्दी झाली. यासह येथील देवी यात्रा उत्सवालाही दरवर्षीप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळाला. लहान-मोठ्या सर्वांनीच यात्रेचा आनंद लुटला. या देवी यात्रा उत्सवाचा गुरुवारी शेवटचा दिवस असून, यानिमित्ताने कर्णपुरा परिसरात श्री बालाजी रथ ओढून सीमोल्लंघन केले जाणार आहे. यासाठी मंदिर विश्वस्तांकडून तयारी करण्यात आली असून, घट हलविल्यानंतर सांयकाळी श्री बालाजींची महाआरती होईल. त्यानंतर गोविंदा... गोविंदा.. व्यंकटरमणा च्या निनादात रथ ओढण्यास सुरुवात होणार आहे.
यावेळी हजारो भाविकांसह शहरातील मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीम्मोलंघनाचा हा सोहळा भक्तिभावासह उत्साहात पार पडणार आहे.

