A Mylan Pharma manager has finally arrested in a drugs case.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वाळूज एमआयडीसीतील मायलान फार्मा कंपनीच्या मेडिकल वेस्टमधून एमडी ड्रग्सची तस्करी करणारे रॅकेट उघडकीस आल्यानंतर आता कंपनीच्या एका व्यवस्थापकाच्या हातात बेड्या पडल्या आहेत.
गुन्हे शाखेने कंपनीच्या पर्यावरण आरोग्य सुरक्षा विभागाचा व्यवस्थापक किशोर पवार (५६, रा. आदित्यनगर, उल्कानगरी) असे अटकेतील व्यवस्थापकाचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी रविवारी (दि. २९) दिली. त्याने आर्थिक स्वार्थासाठी जाणीवपूर्वक कंपनीतील गोळ्याची पावडर (एमडी) बबन खानला दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
वाळूज एमआयडीसीतील मायलान फार्मा कंपनीच्या मेडिकल वेस्टमधून एमडी ड्रम्स या प्रतिबंधित अमली पदार्थासाठी वापरली जाणारी गोळ्यांची पावडर कचऱ्याच्या नावाखाली कचरा उचलण्याचे काम करणारा कंत्राटदार मालक बबन खान नजीर खान (६५), त्याची दोन मुले कलीम खान बबन खान (४१), सलीम खान बबन खान (३५, तिघेही रा. जुना बाजार), आयशर चालक शफीफुल रहेमान तफज्जुल हुसेन (४५) आणि राज रामतीरथ अजुरे (३८, दोघेही रा. उत्तरप्रदेश) यांची टोळी थोडी थोडी पावडर जमा करून त्याची ड्रग्स तस्करी करत असल्याचे एनडीपीएसच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने उघडकीस आणले होते. या पाच जणांना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने कंपनीतील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अनेकांची चौकशी करून जबाब नोंदविले. त्यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांचे धावे दणाणले होते. अटकेच्या भीतीने अनेकांना घाम फुटला होता.
जे रसायन कंपनीतून शासनमान्य एजन्सीकडे नष्ट करण्यासाठी पाठविणे अपेक्षित होते ते भंगाराच्या नावाखाली बाहेर खानच्या गोदामात येत होते. त्यामुळे यात अनेक मोठे मासे गळाला लागू शकतात. मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. किशोर पवारला चौकशीसाठी बोलावून गुन्ह्यात सहभाग निष्पन्न होताच अटक करण्यात आली. पाच आरोपींची २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी होती. पोलिसांनी रविवारी सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना २ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
बबन खानने कोट्यवधींची उलाढाल बिटकॉईनमार्फत केल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे क्रिप्टो करन्सीचे रुपयांमध्ये रूपांतर करून देणारा तसेच खानला पाठबळ देणारा वाळूजमधील एक राजकीय व्यक्तीही चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतो, असे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, खानची ८ बँक खाती पोलिसांनी गोठवली असून, त्याच्या सर्व आर्थिक व्यवहाराची माहिती मागविण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ई-मेलमध्ये कंपनीने म्हटले आहे की, पोलिस चौकशीत आम्ही सर्व अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. तो पदार्थ आमच्या सुविधेमध्ये तयार केला जात नाही. आमची संपूर्ण उत्पादने जबाबदारीने तयार केली जातात. सर्व कायदे व नियमांचे तंतोतंत पालन करण्याची वचनबद्धता आमची कायम आहे, यासह अन्य मजकूर असलेला ई-मेल कंपनीच्या मुख्य कार्यालयातून पोलिसांना आला आहे.
आरोपी किशोर पवार हे मायलान कंपनीच्या पर्यावरण, आरोग्य सुरक्षा विभागाचे व्यवस्थापक आहेत. बबन खानला बायोवेस्ट उचलण्याची परवानगी नसतानाही पवारने त्याला अर्थपूर्ण सहकार्य केल्याचे तपासात समोर आले. यासोबतच या विभागातील अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, खानला मायलान कंपनीचे टेंडर त्याच्या ओळखीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या मदतीने मिळाले होते. तो अधिकारी आशिया खंडाचा प्रमुख होता. त्यामुळे या ड्रग्स तस्करी प्रकरणात गोळ्यांची पावडर बाहेर काढून देणाऱ्यांसह खानकडून आर्थिक प्रगती करून घेणारे सर्व जण गोत्यात येणार आहेत.