Sambhajinagar News : नारेगाव, चिकलठाण्यात ७३५ प्लॉट जमीनदोस्त file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : नारेगाव, चिकलठाण्यात ७३५ प्लॉट जमीनदोस्त

२३.५ एकरांवरील प्लॉटिंगवर हातोडा

पुढारी वृत्तसेवा

735 plots razed in Naregaon and Chikalthana

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नारेगाव आणि चिकलठाणा परिसरात परवानगीविना प्लॉटिंग करून भूखंड विक्रीची तयारी करणाऱ्यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी (दि. २४) दणका दिला. दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत २३.५ एकर जागेवरील तब्बल ७३५ अनधिकृत प्लॉटच्या खुणा आणि हद्दी हटविण्यात आल्या. यासह नारेगावातील प्लॉटसाठी तयार करण्यात आलेले काँक्रीटचे अंतर्गत रस्तेही यंत्रांच्या साहाय्याने तोडण्यात आले.

महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहिमेत सवलत योजना जाहीर केली असून भूखंडाच्या गुंठेवारीसाठी ५० टक्के सवलतही जाहीर केली आहे. ही सवलत देताना मनपा हद्दीत अनधिकृत प्लॉटिंग रोखण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत.

त्यानुसार अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून विविध भागांतील कारवाई हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पथकाने गुरुवारी नारेगाव येथील गट क्रमांक २४ मध्ये खटोड यांच्या मालकीच्या ८.५ एकर जागेवर २४५ प्लॉटची आखणी करण्यात आली होती.

या प्लॉटच्या सीमा निश्चित करण्यासाठी जागोजागी खुणा करण्यात आल्या होत्या. तसेच भूखंडांपर्यंत जाण्यासाठी काँक्रीटचे अंतर्गत रस्तेही तयार करण्यात आले होते. अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करीत प्लॉटच्या खुणा, हद्दी आणि काँक्रीटचे रस्ते काढून टाकले. नारेगाव येथील कारवाईनंतर पथकाने आपला मोर्चा चिकलठाण्याकडे वळवत गट क्रमांक ३६५ येथे कारवाई केली. येथील १५ एकर जागेवर ४९० अनधिकृत प्लॉटची आखणी करण्यात आली होती. या जमिनीचे मूळ मालक दिगंबर दहीहंडे असून, प्लॉट विक्रीचे काम जाफर काझी आणि मोहम्मद आरिफ यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

अनधिकृत प्लॉटिंगविरोधात कारवाईचा धडाका

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने यापूर्वी पडेगाव, देवळाई, हसूल यासह विविध भागांतील अनाधिकृत प्लॉटिंगवर कारवाई केली असून काही प्रकरणात गुन्हेही दाखल केले आहेत. त्यानंतर पथकाने नारेगाव आणि चिकलठाणा परिसरात कारवाई करून २३.५ एकर जागेवरील ७३५ अनधिकृत प्लॉटच्या खुणा व हद्दी निष्कासित केल्या. काँक्रीट रस्तेही तोडण्यात आले. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने आणि संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT