Crops Damaged : सिल्लोड तालुक्यात ७० टक्के पिकांचे नुकसान file photo
छत्रपती संभाजीनगर

Crops Damaged : सिल्लोड तालुक्यात ७० टक्के पिकांचे नुकसान

४० दिवसांचा पावसाचा खंड; कृषी विभागाच्या पीक पाहणीत गंभीर स्थिती

पुढारी वृत्तसेवा

70% of crops damaged in Sillod Taluka

राजू वैष्णव

सिल्लोड : तालुक्यात सलग सुमारे ४० दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. कृषी विभागाच्या पीक पाहणीत काही मंडळांमध्ये ६० ते ७० टक्के पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मका व सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला असून, कापूस पिकावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.

१० ऑगस्टनंतर पावसाने पाठ फिरवल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. फुले व पाते गळण्याचे प्रमाण वाढले असून, अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनात ४० ते ५० टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. पिकांची सद्यस्थिती, अपेक्षित उत्पादन आणि संभाव्य नुकसानीचा अहवाल महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.

जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, तर जुलैमध्ये काही मंडळांत अतिवृष्टी झाली. जुलैतील पावसामुळे केळगाव लघु प्रकल्प भरला असून, खेळणा मध्यम प्रकल्पात ७५ टक्के साठा झाला आहे. हे दोन प्रकल्प वगळता तालुक्यातील बहुतांश जलसाठे अद्याप कोरडे असून, ग्रामीण भागाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

सोशल मीडियावरील 'ते' पत्र बनावट

दरम्यान, राज्य शासनाने दुष्काळी यादी जाहीर केल्याचे पत्र सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. या कथित यादीत सिल्लोड-सोयगाव तालुके वगळल्याचा दावा करण्यात आला. मात्र हे पत्र बनावट असल्याचा खुलासा तालुका प्रशासनाने केला आहे.

आ. सत्तारांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सिल्लोड-सोयगाव तालुक्यात पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसाच्या खंडामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT