65 businessmen committed GST fraud
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य वस्तू व सेवाकर विभागाच्या पडताळणीत तब्बल १,४१२ व्यापाऱ्यांची प्रकरणे संशयित आढळली. यापैकी ३७२ प्रकरणाच्या प्राथमिक तपासणीतून ६५ व्यावसायिकांनी शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाणार आहे. अंतिम तपासणीत या ६४ व्यावसायिकांनी इनपूट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
एक देश एक कर प्रणाली लागू झाल्यानंतरही अनेक व्यावसायिकांकडून तांत्रिक बाबीच्या आड शासनाची फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहे, अशी फसवणूक टाकळण्यासाठी जीएसटी विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञाचा लाभ घेत डेटा अनॅलिटीकल (माहितीची पडताळणी) सुरू केली आहे. यात मागील महिन्यात उच्चस्तरीय कार्यालयातून छत्रपती संभाजीनगर विभागाला १,४१२ जणांचे ऑडिट करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आतापर्यंत जीएसटी विभागाने ३७२ व्यापाऱ्यांचे ऑडिट केले. यात ६५ व्यापाऱ्यांना प्रथमदर्शनी थेट शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.
त्यामुळे त्यांचे आता जीएसटी नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. यात दोषी आढळून आल्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत वस्तू व सेवाकर विभागाकडून देण्यात आले आहेत.
वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या १,४१२ व्यापाऱ्यांपैकी तपासणी करण्यात आलेल्या ३७२ मधून ६५ जणांच्या माहितीत तांत्रिक दोष दिसून आले. त्याचबरोबर काही ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर आस्थापनाच दिसून आल्या नाहीत. तसेच काही व्यापाऱ्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा प्रकारही यावेळी दिसून आला. त्यामुळे त्यांची आता इनपूट टॅक्स क्रेडिटची माहिती तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पडताळणीमध्ये ६५ जणांनी फसवणूक केल्याचे समोर आले. त्यांच्यावर नोंदणी रद्द करण्याची कारवाई सुरू केली. याचबरोबर त्यांनी इनपूट टॅक्स क्रेडिट घेतले असले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर उर्वरित व्यापाऱ्यांचे ऑडिट करण्यात येत आहेत.अभिजीत राऊत, सहआयुक्त, राज्य वस्तू व सेवाकर विभाग