465 farmers ended their lives in Marathwada in six months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या छायेत शेतकरी अडचणीत सापडले असून, जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
या प्रकरणांपैकी २१५ प्रकरणे मदतीस पात्र ठरली असून, २२२ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. पात्र ठरलेल्या प्रकरणांपैकी केवळ १०८ कुटुंबांनाच आर्थिक मदत मिळाली असून, उर्वरित वारसांना अद्याप मदतीची प्रतीक्षा आहे. गतवर्षी (२०२५) मराठवाड्यात १,१३१ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या.
त्यापैकी ९५१ प्रकरणे मदतीस पात्र, तर १५६ अपात्र ठरली होती. शासनाने ९४५ कुटुंबांना आर्थिक मदत दिली होती. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २५६, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २२४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती.
मदत वितरणाला विलंब
यंदा मदत वितरणाची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. पात्र ठरलेल्या २१५ प्रकरणांपैकी केवळ १०८ कुटुंबांना मदत मिळाली असून, २२२ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे मृत शेतकऱ्यांच्या वारसांना महसूल कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असून, तातडीने मदत वितरित करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.