

किनवट : येथील भरडधान्य खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केला असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना हमीभावापासून वंचित ठेवून व्यापाऱ्यांचा माल शासनाकडे विकला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा 5 जून रोजी इस्लापूर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
उपप्रादेशिक अधिकारी प्रफुल्ल सोयाम यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, किनवट तालुक्यात सुमारे दहा हजार हेक्टरवर मका व ज्वारीची लागवड झाली असून, भरडधान्य खरेदीतील विलंब व कथित गैरव्यवहारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने 13 एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल, असे जाहीर केले होते. मात्र, त्यापूर्वीच 10 ते 12 एप्रिलदरम्यान ‘टेस्टिंग’च्या नावाखाली नोंदणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या नोंदी रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; परंतु सध्या सुरू असलेल्या खरेदीत त्याच नोंदींचा समावेश असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
इस्लापूर खरेदी केंद्रावर मोठ्या ट्रकद्वारे माल आणला जात असून तो व्यापाऱ्यांचा असल्याचा संशय संघटनेने व्यक्त केला आहे. आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकरी कमी दरात व्यापाऱ्यांना धान्य विकतात आणि नंतर त्याच धान्याला हमीभाव मिळत असल्याने व्यापाऱ्यांचा फायदा होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
22 मेपासून सुरू झालेल्या खरेदीमध्ये आतापर्यंत 18 शेतकऱ्यांचा सुमारे 1200 क्विंटल मका व 36 शेतकऱ्यांची सुमारे 1300 क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. यंदा आदिवासी विकास महामंडळाला ज्वारीचे 45 हजार क्विंटल व मक्याचे 65 हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
मात्र, उपलब्ध गोदामांमध्ये मर्यादित जागा शिल्लक असून बारदान्याचाही तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलधरा, बोधडी, चिखली, किनवट, राजगड, सारखणी व मांडवी येथे अतिरिक्त खरेदी केंद्रे सुरू करावीत, बाजार समितीची गोदामे उपलब्ध करून द्यावीत तसेच बचत गटांच्या माध्यमातून खरेदी प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
“नोंदणी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे प्रथम शेतकऱ्यांच्या नावांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सातबारा ऑनलाइन अपलोड करताना काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्या. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली असून, दि. 13 एप्रिलपासून झालेल्या नोंदणीच्या यादीप्रमाणेच भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे. संबंधित तांत्रिक त्रुटीबाबत संगणक ऑपरेटरला नोटीसही बजावण्यात आली आहे. भरडधान्य खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांनी अनावश्यक संशय न घेता खरेदी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सहकार्य करावे.”
प्रफुल्ल एस. सोयाम. प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, किनवट