Sambhajinagar News : जिल्ह्यातील ३६०० शिक्षक कार्यमुक्त : चुकीची माहिती भरलेल्यांवर होणार निलंबनाची कारवाई File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : जिल्ह्यातील ३६०० शिक्षक कार्यमुक्त : चुकीची माहिती भरलेल्यांवर होणार निलंबनाची कारवाई

बदली प्रक्रियेत शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची गटशिक्षणाधिकारी पातळीवर पडताळणी करण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

3600 teachers in the district relieved of duty: Suspension action will be taken against those who filled in wrong information

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर बदली झालेल्या सुमारे ३६०० शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. दुसरीकडे बदली प्रक्रियेत शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची गटशिक्षणाधिकारी पातळीवर पडताळणी करण्यात येत आहे. ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती सादर केली आहे, त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी बुधवारी (दि. २४) स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेअंतर्गत साडे आठ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. यंदा या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. त्यासाठी आधी शिक्षकांकडून ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक माहिती नोंदवून घेण्यात आली. त्यानंतर शिक्षण विभागाने ३६०० शिक्षकांच्या बदल्या केल्या. मात्र, काहींनी स्वतः आजारी असल्याचे, आई वडिल, पत्नी, अपत्य दुर्धर आजारी असल्याचे तसेच अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करुन सोयीच्या बदल्या मिळविल्या. या प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया थांबविली होती.

दरम्यान, शिक्षक समितीसह विविध शिक्षक संघटनांनी चौकशी समिती नियुक्त करण्याची तसेच शिक्षकांनी सादर केलेल्या सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पडताळणी करण्यात यावी, दोषी शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली. शिक्षक समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषणही सुरू करण्यात आले होते. दाखल्यांची शिक्षण विभागाने बुधवारी बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश निर्गमित केले. तर दुसरीकडे ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती सादर केली आहे, त्यांच्यावर कार्यवाहीची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. सध्या गटशिक्षणाधिकारी स्तरावरुन शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पडताळणीनंतर ज्या शिक्षकांनी चुकीची कागदपत्र सादर केली, त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले आहे.

सर्व तालुक्यांच्या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ९ शिक्षकांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्याचे समोर आले आहे. इतर तालुक्यांचे अहवाल येणे बाकी आहे. सर्वांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT