

Petrol bottle explodes, four seriously injured
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील खंडाळा येथे एका घरातील नवरात्र देवीच्या घाटाजवळ दुचाकीसाठी आणलेल्या पेट्रोलच्या बाटलीचा भडका उडून एकाच परिवारातील चार जण गंभीर भाजल्याची घटना बुधवारी (दि. २४) घडली असून, जखमेवर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात सुरू आहेत.
अधिक माहिती अशी की सध्या घराघरांमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने प्रत्येकाच्या घरामध्ये नवरात्र देवीच्या घट स्थापना करण्यात आलेला असताना खंडाळा येथील प्रकाश दळवी यांनी आपल्या मोटरसायकलसाठी पेट्रोल पंपावरून बॉटलमध्ये पेट्रोल आणून घरामध्ये ठेवले होते. परंतु देवीच्या घाटाजवळ दिवा लावलेला असताना या दिव्याच्या आगेमुळे पेट्रोलच्या बाटलीचा अचानक भडका उडाल्यामुळे घरात एकच गोंधळ निर्माण झाला.
घरात असलेले प्रकाश मोहन दळवी, राधा दळवी, दादा प्रकाश दळवी, गोपाळ प्रकाश दळवी या पेट्रोलच्या झालेल्या अचानक भडक्यामध्ये गंभीर भाजल्याची घटना घडली. सदरची घटना परिसरात राहणाऱ्या नागरिकाच्या निदर्शनास आल्यामुळे तात्काळ या घटनेची माहिती पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित, विहामांडवा पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे, जमादार किशोर शिंदे यांना देण्यात आली. पोलीस पथकाने घटनास्थळ हजर होऊन घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेत जखमी झालेले एकच परिवारातील जखमेला प्रथम पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सदरील परिवारातील काही व्यक्ती ४० ते ४५ टक्के भाजल्यामुळे पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) येथे दाखल केले. या घटनेसंदर्भात पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आले असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हरीविजय बोबडे, जमादार किशोर शिंदे करीत आहेत.