

Sambhajinagar Crime A young man was beaten with a weapon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मित्रांसोबत गप्पा मारत उभारलेल्या तरुणाला तू माझ्याकडे का बघतो, माझ्याकडे पाहून काय बोलत आहे, असे म्हणून शिवीगाळ करून शस्त्राने हल्ला चढविला. त्याच्या तोंडावर, कपाळावर, डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळव-ारी (दि. २३) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सिडको एन-५ परिसरातील जिजामाता शाळेसमोर घडली.
सोहम शामराव कापसे (१८) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी राम मोतीराम मुंढे (रा. सिडको एन-५ गुलमोहर कॉलनी) याला पोलिसांनी अटक केली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी सचिन शामराव कापसे (४१, रा. संभाजी कॉलनी, सिडको एन-६) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मोठा मुलगा सोहम हा मंगळवारी रात्री सव्वासात वाजता जिजामाता शाळा येथे मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. यावेळी राम मोतीराम मुंढे हा त्याच्याजवळ आला. तुम्ही माझ्याकडे पाहून काय बोलता, असे म्हणून शिवीगाळ सुरू केली.
त्यानंतर खिशातून धारदार शस्त्र काढून थेट सोहम याच्या तोंडावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. हा घडलेला प्रकार सोहमच्या मित्रांनी सचिन कापसे यांना सांगितला. त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केले असून, गंभीर मार लागल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास जमादार शिवाजी भोसले करीत आहेत.