Sillod Crime News : साडेतीन लाख लिटर घातक रसायन जप्त; दहा जणांवर गुन्हा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod Crime News : साडेतीन लाख लिटर घातक रसायन जप्त; दहा जणांवर गुन्हा

सिल्लोड : घातक रसायन रॅकेटचा पर्दाफाश, ऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

3.5 lakh litres of hazardous chemicals seized; case registered against ten individuals

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : घातक रसायन रॅकेटचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करीत दहा जणांना बेड्या ठोकल्या. तर ३ लाख ५२ हजार घातक रसायन जप्त केले. विशेष म्हणजे यात चार आरोपी परराज्यांतील असून, जवळपास १ महिना ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास करीत संघटित गुन्हेगारीचा पर्दाफाश केला.

मुख्य आरोपी अब्दुल गफ्फार खान हमीद खान पठाण (रा. आयटीआय कॉलेज समोर, सिल्लोड), सुदाम बाबुलाल ताटू (रा. उपळी, ह. मु. जयभवानीनगर, सिल्लोड), शेख तौफिक शेख लाल, शेख वसीम शेख बशीर (दोघे रा. अब्दलशाहनगर, - सिल्लोड), समीर खान शाकेर खान (ईदगाहनगर, सिल्लोड), सरताज अली शेख, मोहम्मद जाफर (दोघे रा. हैदराबाद, तेलंगणा), व्हीबीआर ग्रीन इन्व्हेरोमेंट कंपनीचे मालक विरेशम भिमैया खरचेल (रा. मुनीपल्ली, जि. सांगारेड्डी, तेलंगणा), शेख अलीम शेख यासीन (रा. जाकीर हुसेननगर, सिल्लोड), मोहंमद नवाब अलीखान मंजूर अहमद (रा. राजपूरन बकौली, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तालुक्यातील पळशी येथील पिरखोरा परिसरात २ जुलैच्या रात्री घातक रसायनाचे बावीस ड्रम निर्जनस्थळी आणून फेकून दिले व पेटवून देत आरोपी पसार झाले होते. तर रसायनाच्या दुर्गंधीमुळे सदर प्रकार समोर आला. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणाचा पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, बीट जमादार, राजेंद्र काकडे, दादाराव पवार व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बाबी व रसायनाच्या ड्रमवरील माहिती काढत तपास करीत या रॅकेटचा पर्दाफाश केला.

दरम्यान यापूर्वी खांदेशमधील जामनेर, सोयगाव तालुक्यातील जंगलामध्ये घातक रसायनाचे ड्रम आणून फेकले होते. या प्रकरणी पहूर (जामनेर) व फर्दापूर (सोयगाव) पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल होते. मात्र ग्रामीण पोलिसांनी घटनेचा तपास करीत एक-एक करीत दहा आरोपींना बेड्या ठोकल्या. फेकलेले रसायन एवढे घातक आहे की, धुरामुळे नागरिकांना गुदमरल्यासारखे होणे, डोळ्यांची आग होणे, असा त्रास जाणवला होता. तर वन्यजीव मृत्युमुखी पडले होते.

९० टन घातक रसायन कचरा जप्त

पोलिसांनी १ हजार ६०० घातक रसायनांच्या ड्रममधून ३ लाख ५२ हजार लिटर घातक रसायन, ४० टन केमिकल पावडर, ५० टन रसायन मिश्रित दूषित माती असा एकूण ९० टन घातक रसायन कचरा जप्त केला. शिवाय ३ ट्रक, १ हायडू मशीन, ७ मोबाईल असा एकूण ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर यातील फरार आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेत मुसक्या आवळल्या.

तपासाची गोपनीयता

पळशी शिवारात घातक रसायन मिळून येताच ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होण्याआधीच यातील काही आरोपीही निष्पन्न केले होते. एक-एक करीत पोलिसांनी आरोपींचा छडा लावला. तर महिनाभराच्या तपासानंतर परराज्यांतून चार आरोपींना बेड्या ठोकल्या. ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याने घातक रसायन रॅकेटचा पर्दाफाश झाला. तर या प्रकरणाचा तपास करताना ग्रामीण पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली, हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT