Teachers Surplus News : २८३ शिक्षक अतिरिक्त, तरी वैजापुरात ७६ जागा रिक्त ! file photo
छत्रपती संभाजीनगर

Teachers Surplus News : २८३ शिक्षक अतिरिक्त, तरी वैजापुरात ७६ जागा रिक्त !

शिक्षण विभागाच्या नियोजनावर स्थायी समितीत प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

283 teachers rendered surplus, yet 76 vacancies remain in Vaijapur

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात २८३ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. मात्र, दुसरीकडे वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल ७६ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने शिक्षण विभागाच्या नियोजनावर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अतिरिक्त शिक्षक असताना रिक्त जागांवर नियुक्त्या का होत नाहीत, असा सवालही करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटल्याने यंदा २८३ शिक्षक अतिरिक्त ठरल्याचा अहवाल शिक्षण विभागाने दिला आहे. मात्र, दुसरीकडे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सदस्य संजय निकम यांनी वैजापूर तालुक्यातील रिक्त पदांचा गोषवारा सादर करीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधले.

७७सहशिक्षकांना मुख्याध्यापकपदी, तर काही शिक्षकांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती दिल्याने त्यांच्या मूळ जागा रिक्त झाल्या आहेत. पदोन्नती देताना रिक्त होणाऱ्या जागांवर शिक्षकांचे समायोजन करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले नव्हते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील रिक्त पदांवर शिक्षक नियुक्त करण्याची मागणी सदस्यांनी केली.

आचारसंहिता संपताच नियुक्त्या करा

शिक्षकांचे समायोजन आणि रिक्त पदांवरील नियुक्त्यांसाठी आगामी २० दिवसांत योग्य नियोजन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. आचारसंहिता संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गरज असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्गणी करून खासगी शिक्षकांची नियुक्ती

सदस्य शिवराज भुमरे यांनी पाचोड सर्कलमधील एका शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने पालक आणि नागरिकांना वर्गणी करून खासगी शिक्षक नियुक्त करावा लागल्याचे सांगितले. वैजापूर तालुक्यातही काही शाळांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. एकीकडे अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असताना दुसरीकडे पालकांवर वर्गणी करण्याची वेळ येत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT