कत्तलीसाठी कंटेनरमधून नेल्या जाणाऱ्या २३ गोवंशांची सुटका file photo
छत्रपती संभाजीनगर

कत्तलीसाठी कंटेनरमधून नेल्या जाणाऱ्या २३ गोवंशांची सुटका

पाचोड पोलिसांची मध्यरात्री पाठलाग करून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

23 cattle being transported in a container for slaughter rescued

आडुळ, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरून बंद बॉडीच्या कंटेनरमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या तब्बल २३ गोवंशांची (बैल) पाचोड पोलिसांनी मध्यरात्री पाठलाग करून सुटका केली.

रजापुर शिवारातील स्वामिनी हॉटेलजवळ बुधवारी (दि.२८) रात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२ लाख ६० हजार रुपये किमतीची २३ जनावरे आणि १२ लाखांचा आयशर कंटेनर असा एकूण २४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अंधाराचा फायदा घेऊन त्याचे दोन साथीदार पसार झाले.

नागरिकाचा अचूक फोन

बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पाचोड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन पंडित यांना जागरूक नागरिकाचा फोन आला. सोलापूर-धुळे मार्गाने एका बंद कंटेनरमधून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रभारी अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असलेल्या 'डायल ११२' पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस अंमलदार व पोहेकॉ/१३३८ दुल्हत यांनी खासगी वाहनाने महामार्गावर सापळा रचला.

नाकाबंदी पाहून दोघांचे पलायन

रात्री पावणेअकराच्या सुमारास रजापूर शिवारात स्वामिनी हॉटेलजवळ संशयित आयशर बंद कंटेनर (एमएच २० ईजी ३७९७) भरधाव वेगाने येताना दिसला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून चालकाला हात दाखवून कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेण्यास भाग पाडले.

पोलिस गाडी पाहताच कंटेनरमधील दोन जण अंधाराचा फायदा घेऊन शेतात पळून गेले. पोलिसांनी चालकाला जागीच पकडले. विचारपूस केली असता त्याने आपले नाव शेख इरफान शेख लुकमान कुरेशी (वय अंदाजे, रा. सुमय्या मशीदजवळ, इदगाह नगर, सिल्लोड) असे सांगितले. पळून गेलेल्या साथीदारांची व कंटेनर मालकाची माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

गोशाळेत खानगी; विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

जप्त केलेला कंटेनर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर रात्रीच्या वेळीच सर्व गोवंशांना सुरक्षिततेसाठी पारसनाथ गोशाळा (पारुंडी, ता. पैठण) येथे हलवण्यात आले. तेथे दोन पंचांसमक्ष मध्यरात्री पंचनामा करण्यात आला. पोलिस अंमलदारांच्या फिर्यादीवरून चालक शेख इरफान, त्याचे पसार झालेले दोन साथीदार आणि कंटेनर मालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बंद कंटेनरमध्ये दाटीवाटीने क्रूरपणे डांबून ठेवले

पोलिसांनी कंटेनरचा दरवाजा उघडून पाहिले असता आतले दृश्य मन हेलावून टाकणारे होते. कोणत्याही प्रकारची चारा-पाण्याची व्यवस्था न करता, श्वास घेणेही कठीण व्हावे अशा दाटीवाटीने २३ निष्पाप बैलांना दोरीच्या साहाय्याने क्रूरपणे डांबून ठेवले होते. यामध्ये खिल्लार, देवणी, काँकरेज आणि गावरान जातीच्या देखण्या बैलांचा समावेश होता. मुक्या प्राण्यांची कत्तलीच्या उद्देशाने चाललेली ही अमानुष वाहतूक पोलिसांनी हाणून पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT