2 wards in each ward reserved for women
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना सुनावणीनंतर राज्य व निवडणूक आयोगाने अंतिम करून त्यास मंजुरी दिली आहे. हा आराखडा महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर आता आर क्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून ५० टक्के आरक्षणामुळे प्रत्येक प्रभागातील चारपैकी दोन वॉर्ड हे महिलांसाठी राखीव राहणार आहेत, त्यामुळे इच्छुकांच्या अडचणी वाढणार आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या आदेशाने प्रशासनाने प्रभाग रचना तयार केली. महापालिकेचे जूने ११५ वॉर्ड असल्याने चार वाँडाँचे २८ प्रभाग आणि एक प्रभाग ३ वाँडाँचा, यानुसार एकूण २९ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. यात प्रभागाची लोकसंख्या ३८ हजार ते ४३ हजारांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे.
तर शेवटच्या २९ व्या प्रभागात मतदार संख्या ही २९ एवढी आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभाग रचना करून ती मान्यतेसाठी राज्य शासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाला पाठवली. राज्य निवडणूक आयोगाने त्यात काह त्रुटी काढल्या, त्याची पूर्तता करून महापालिकेने सुधारित प्रभाग रचनेचा आराखडा पुन्हा आयोगाकडे पाठवला.
या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देत आयोगाने त्यावर सूचना-हरकती मागविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर यात ५५२ हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेऊन काही दुरुस्तीसह आराखडा आयोगा सादर केला गेला. त्यानंतर पुन्हा महापालिकेने आयोगापुढे सादरीकरण करीत प्रभाग रचना कशी तयार केली. याबाबत माहिती दिली. दरम्यान, आयोगाने या प्रभाग रचनेला मंजुरी देत अंतिम केली.
तसेच महापालिकेला ही प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे आदेशही दिले. त्यानुसार हा आराखडा आता प्रसिध्द केला जाणार आहे. या प्रक्रियेनंतर आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थान निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण मंजूर असल्याने प्रत्येक प्रभागातील दोन वॉर्ड हे महिलांसाठी राखीव राहणार असल्याने अनेकांच्या अडचणी वाढणार आहे.
एका प्रभागातील चारपैकी दोन वॉर्ड महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. जे दोन वॉर्ड आरक्षित असणार आहेत त्यात एससी, एसटी, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणाचा समावेश असणार आहे. त्यामुळे सोडतीमध्ये कोणता वॉर्ड कोणत्या प्रभागासाठी आरक्षित असेल, अनेकांनी आपले वॉर्ड सुरक्षित राहण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.