

Municipal Corporation's contract employees on strike; no salary for 5 months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : महापालिकेला कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या महाराणा एजन्सीत आणि प्रशासनात मागील वर्षभरापासून वाद सुरू आहे. अखेर या वादाचा समारोप कंत्राट रद्द करण्याच्या निर्णयाने झाले. मात्र, आता ५ महिन्यांच्या पगारीवरून चार दिवसांपासून कंत्राटदार एजन्सी व महापालिकेत लेटरवॉर सुरू असून यात भरडले जाणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आता काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी सिद्धार्थ उद्यानातील अनेक कंत्राटी कर्मचारी संपावर होते.
महापालिकेला सर्वाधिक कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या महार-ाणा एजन्सीचे काम गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासकांनी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लागलीच प्रशासकांनी महाराणाकडे असलेले १६०५ कर्मचारी अशोका आणि गॅलेक्झी एजन्सीकडे वर्ग केले. या तडकाफडकी निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनावर महापालिका प्रशासन आणि महाराणा एजन्सी यांच्यात लेटरवॉर सुरू झाले आहे.
मागील चार दिवसांपासून दोन्हींकडून एकमेकांना पत्र देण्यात येत आहे. यात महापालिका एजन्सीला म्हणते कामगारांचे पगार अगोदर करा नंतर थकीत पगारीचे बिल अदा करू, तर महाराणा एजन्सीने असे करारात कुठेही नमूद नसल्याचे सांगत महापालिकेला प्रत्युत्तर दिले.
या दोघांच्या भांडणात कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आता काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सिद्धार्थ उद्यानातील अनेक कर्मचाऱ्यांनी शनिवारी हजेरी लावून काम बंद ठेवले होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना ५ महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळी आली आहे. आता तर ड्युटीवर येण्याजाण्याच्या किरायासाठी देखील पैसे नाहीत. मग कामावर कसे यावे, असा सवाल अनेकजण उपस्थित करीत आहेत.