निवडणुकीच्या रणांगणातून 161 उमेदवारांची माघार File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : निवडणुकीच्या रणांगणातून 161 उमेदवारांची माघार

जिल्ह्यात ६५९ उमेदवार मैदानात : रंगणार राजकीय आखाडा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. दाखल झालेल्या ८२० वैध अजर्जापैकी शुक्रवार (दि.२१) पर्यंत तब्बल १६१ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ६५९ उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यात ४२ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी, तर सदस्य पदासाठी ६१७ उमेदवार नशीब आजमावणार आहेत.

जिल्ह्यातील ६ नगर परिषद आणि १ नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी १७ नोव्हेंबर अंतिम मुदत होती. यात जिल्ह्यात एकूण १४०१ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले होते. यात नगराध्यक्ष पदासाठी ८९, तर सदस्य पदासाठी तब्बल १३१२ अर्ज दाखल झाले होते. यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया मंगळवारी (दि.१८) पार पडली. यात नगराध्यक्ष पदासाठीचे २०, तर सदस्य पदासाठीचे ४३० असे ४५२ अर्ज अवैध ठरले होते.

त्यामुळे अध्यक्ष पदासाठी ५४, तर सदस्य पदासाठी ७६६ असे एकूण ८२० अर्ज वैध ठरले होते. दरम्यान, अर्ज मागे घेण्यास तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. यात कोण कोण अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानुसार शुक्रवार (दि.२१) पर्यंत १६१ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. आता निवडणूक रिंगणात ६५९ उमेदवार शिल्लक असून, त्यांच्यामध्ये मराजकीय कुस्तीफ होणार आहे.

छाननीनंतर नगरपरिषद, नगरपंचायतीत आपल्याला सहज विजय मिळावा म्हणून विरोधकांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यात काहींना यशही आले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर आता निवडणूक मैदानात ६५९ उमेदवार आपले राजकीय नशीब अजमावणार आहेत. इच्छुक उमेदवारांपैकी काहींनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यावर २६ नोव्हेंबरपर्यंत निकाल अपेक्षित आहे. या निकालानंतर मैदानात किती उमेदवारांमध्ये फाईट होईल हे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रचाराची वाढली लगबग

अर्ज दाखल केल्यापासूनच जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. उमेदवारांकडून घराघरांत जाऊन जनसंपर्क, गाठीभेटी, बैठकांचे नियोजन, प्रचाराची रणनीती यावर भर दिला जात आहे. शेतावर, बाजारपेठांमध्ये, कार्यक्रमांत, लग्नसमारंभात उमेदवारांची धावपळ वाढली असून, ग्रामीण भाग अक्षरशः निवडणुकीच्या रंगात रंगला असल्याचे दिसून येत आहे. गुलाल उडणार तर तो आपलाच, असा निर्धार अनेक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT