

Four men robbed a man at knifepoint in the Ghati Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा: पत्नीला घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती केलेल्या चालकाला डब्बा घेण्यासाठी पार्किंगमध्ये येताच चौघांनी चाकू लावून लुटले. चांदीचे ब्रेसलेट, १२०० रुपये काढून घेत तिघे पसार झाले, तर एकाला चालकाने पकडून पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार गुरुवारी (दि.२०) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला.
यश विनोद सूर्यवंशी (२०, रा. ब्राह्मण गल्ली, बेगमपुरा), आकाश बबन रामफळे (२१), बलराम दीपक जाधव (२१, दोघे रा. घाटी क्वार्टर) आणि प्रेम राजेंद्र सिसोदे (१९, रा. ब्राह्माणगल्ली, बेगमपुरा) अशी आर ोपींची नावे आहेत. चौघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी सिटी चौक हद्दीत यश सूर्यवंशी याच्या तोंडात चाकू खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. तोच यश या गुन्ह्यात आता आरोपी बनला आहे.
फिर्यादी दौलत प्रभत जंगले (३८, रा. कानेगाव, फुलंब्री) यांच्या तक्रारीनुसार, ते ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करतात. त्याच्या पत्नीला बुधवारी प्रसूतीसाठी घाटीत दाखल केले होते. पहाटे प्रसूत झाल्यानंतर पत्नी व बळावर उपचार चालू असल्याने देखभालीसाठी जंगले घाटीतच थांबले होते.
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचे नातेवाईक डब्बा घेऊन येणार असल्याने ते घाटीच्या पार्किंगमध्ये वाट पाहत थांबले होते. त्याचवेळी अचानक चौघांनी त्यांना पकडून चाकू दाखवून धमकावले. हातातील १२ हजारांचे चांदीचे ब्रेसलेट, खिशातील १२०० रुपये काढून घेतले. जंगले यांनी विरोध केला असता त्यांना मारहाण सुरू केली. बचावासाठी जंगले यांनी त्यातील सूर्यवंशीला पकडून ठेवले, तर तीन जण पळून गेले. त्याला घाटी पोलिस चौकीत घेऊन गेल्यानंतर पोलिसांची गाडी आली. बेगमपुरा ठाण्यात घेऊन गेल्यानंतर सूर्यवंशीने त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर जंगले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मारोती मदेवाड करत आहेत.
दारू, नशेसाठी लूटमार
चौघेही दारू, नशेसाठी लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. घाटी रुग्णालयातून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. नशेखोरांचाही वावर वाढला आहे. त्यातच आता थेट रुग्णालयाच्या आवारात चाकू, शस्त्र दाखवून लुटणाऱ्या टोळ्याच सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना ओरडण्यापलीकडे सुरक्षारक्षक करतात काय? असा सवाल नागरिक विचारत आहेत.