

600 more polling stations to be added for municipal elections
अमित मोरे
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अगामी निवडणुकीसाठी आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. आता ८ डिसेंबरपर्यंत मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. एका प्रभागात किमान ४५ मतदान केंद्र राहणार असून, यापूर्वीचे जूने ७०० मतदान केंद्र जैसे थे ठेवून नव्याने सुमारे ६०० केंद्र तयार केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या कार्यक्रमानुसार प्रशासन कामाला लागले आहे. यापूर्वी प्रशासनाने निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार केली. आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली. १ जुलै २०२५ दिनांकापर्यंतच्या मतदार याद्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची विभागनी केली. त्या प्रसिद्ध करून हरकती सूचना दाखल करण्यासाठी नेमुदत दिली आहे. यासोबतच प्रशासनाकडून आता प्रभागनिहाय मतदार केंद्रही तयार केले जात आहे.
महापालिकेची निवडणूक यंदा प्रभागनिहाय होत असल्याने त्यासाठी २०१५ सालच्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांची संख्याही दुपटीने वाढणार आहे.'यापूर्वी २०१५ साली महापालिकेची निवडणूक झाली होती. यात ११५ वॉर्डासाठी ७०० मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या एका वॉर्डात ६५०० पर्यंत मतदार होते.
त्याप्रमाणे एका वॉर्डासाठी ५ ते ६ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. यातील एका केंद्रात सुमारे १२५० ते १३०० मतदारांचा समावेश होता. परंतु यंदा प्रभागनिहाय निवडणुका होत असून, एका प्रभागात मतदारांची संख्या ही सुमारे ३८ ते ४५ हजारांपर्यंत आहे. त्यामुळे प्रभागांतील मतदान केंद्रांची संख्या वाढणार असून, एका केंद्रात किमान ८५० ते ९०० मतदार राहणार आहेत. त्यानुसार एका प्रभागात सुमारे ४५ मतदान केंद्र राहतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. येत्या ८ डिसेंबरपर्यंत मतदान केंद्र तयार करून त्याची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पहिल्या दिवशी ७ हरकती
प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली. त्यानंतर नागरिकांसह इच्छुकांनी मतदार याद्यांची तपासणी करून आपले नाव कोणत्या प्रभागात आहे, हे तपासण्यास सुरुवात केली. यात दोन दिवशी सात हरकती महापालिका निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या असून, २७ नोव्हेंबरपर्यंत सूचना, हरकतींसाठी मुदत आहे.
४० जणांनी नेल्या याद्या
शहरातील २९ प्रभागांत मोठ्याप्रमाणात इच्छुकांची संख्या असून, आपले मतदार आपल्याच प्रभागात आहेत की, इतर ठिकाणी नाव स्थलांतरित झाले, हे शोधण्यासाठी अनेकांनी मतदार याद्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत सुमारे ४० जणांनी याद्या खरेदी करून नेल्या आहेत, अशी माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
२०१५ ची स्थिती
वॉर्ड ११५
मतदान केंद्र संख्या-७००
महिला मतदार-३९९९३७
पुरुष मतदार-४४६९३४
एकूण मतदार-८४६८७१
२०२५ ची स्थिती
प्रभाग २९
महिला मतदार-५७४९३३
पुरुष मतदार-५४३०९९
इतर मतदार-८६ (तृतियपंथी)
एकूण मतदार-१११८११८