12 two-wheelers seized from two members of a vehicle theft gang
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुचाकीचे इग्निशन स्विच जुने, सैल अथवा खराब असलेल्या दुचाकी हेरून त्या पळविणाऱ्या जालना जिल्ह्यातील कृष्णा नारायण मुरुडकर (३०) आणि शेख कलीम शेख जब्बार (३२) या दोन सराईत चोरट्यांना हसूल पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्याआहेत. या टोळीतील तिसऱ्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत.
जाधववाडीतील विक्की शेषराव चौथमल (२८) यांची दुचाकी २९ ऑगस्ट रोजी घरासमोरून चोरीला गेल्यानंतर हर्मूल पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीवरून चोरीचा धागा थेट भोकरदन तालुक्यातील वालसावंगीपर्यंत पोहोचला. १७ सप्टेंबर रोजी शिवना-सिल्लोड परिसरातून कृष्णा मुरुडकर याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर सहा दुचाकी मिळाल्या. त्यानंतर त्याचा साथीदार शेख कलीमकडून आणखी सहा दुचाकी जप्त केल्या. ही टोळी घरासमोर किंवा पार्किंगमध्ये उभे असलेल्या दुचाकीचे इग्निशन तपासायाचे जे खराब आहे त्या दुचाकीला लक्ष करून ते काही क्षणात पळवायचे. अशी माहिती तपासात समोर आली आहे.
वालसावंगीचे दोघे रेकॉर्डवर
कृष्णा मुरुडकर आणि शेख कलीम हे दोघेही भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील रहिवासी आहेत. दोघांचीही पोलिस दप्तरी सराईत गुन्हेगार म्हणून नोंद आहे. कृष्णा मुरुडकर याला यापूर्वी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. दरम्यान या टोळीत तिसऱ्या साथीदाराचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा शोध सुरू आहे.
ग्रामीण भागात विक्री
चोरलेल्या दुचार्कीपैकी चांगल्या स्थितीतील गाड्यांची ग्रामीण भागात विक्री केली जात होती. अवघ्या १० हजार रुपयांत दुचाकी विकून आलेले पैसे दारुत उडवायचे अशीही माहिती समोर आली आहे. १२ दुचाकींच्या जप्तीनंतर हर्मूल पोलिस ठाण्यातील चार आणि सिडको पोलिस ठाण्यातील सात, असे ११ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यामुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांमागील एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे