12 highways stolen from tehsil in a year
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी वाहने महसूलच्या पथकांकडून वेळोवेळी पकडण्यात येतात. मात्र ही वाहने तहसील कार्यालयातूनच चोरीला जात आहेत. मागील वर्षभरात जिल्हाधिकारी परिसरातील तहसील कार्यालयातून तब्बल १२ पेक्षा जास्त हायवा चोरीला गेल्या. आता ही चोरी थांबवण्यासाठी चोवीस तास शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी अप्पर तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
जिल्ह्यात गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होते. महसूलच्या पथकांकडून वारंवार कारवाया करुन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक, टॅक्टर जप्त केले जातात. जप्त केलेली ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात येतात. अप्पर तहसील कार्यालयाच्या परिसरातील गेल्या काही काळात सातत्याने असे हायवा चोरून नेले जात आहेत. या कार्यालयाच्या आवारामध्ये रात्रीच्या वेळी नशेखोर बसलेले असतात. लाईटची पुरेशी व्यवस्था नाही,
सीसीटीव्ही नाही आणि सुरक्षा गेटही तुटलेले आहे. त्यामुळे या परिसरातील तहसील कार्यालयासह, रजिस्ट्री कार्यालय, बँक, राज्य माहिती आयोगाचे कार्यालय वाऱ्यावर आहे. याठिकाणी शस्त्रधारी गार्ड नेमण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष होत असल्याने याचा फायदा महसूल प्रशासनातील काही कर्मचारी घेत असून, यामुळेच ही वाहने चोरी होत असल्याचा आरोप होत आहे. गेल्या वर्षभरात येथून तब्बल १२ हायवा चोरी गेल्या आहेत.
आम्ही कारवाई करून गौण खनिज चोरी करणारे हायवा पकडतो, परंतु तहसीलच्या आवारातून ते चोरी जातात. या प्रकरणी गुन्हे दाखल केले. म्हणून बंदूकधारी गार्ड नेमणे, नवीन गेट बांधणे यासारख्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत. जप्त वाहने पोलिस स्टेशनच्या आवारात लावण्याचा विचारही सुरू आहे.उमेश पाटील, अप्पर तहसीलदार
जप्त केलेली वाहने सांभाळण्याची जबाबदारी ही संबंधित कार्यालयाचीही आहे. वाहन चोरी झाल्यास गुन्हा दाखल करून गाडी मालकाच्या मालमत्तेवर बोजा चढवणे, आरटीओला सूचना देऊन हा हायवा रस्त्यावर फिरणार नाही यासाठी कारवाई करणे अपेक्षित आहे. तहसील परिसरात लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे.जनार्धन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी