

Three arrested for robbing businessman
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा स्टेशनरी दुकानदाराला रेकी करून दुकान बंद करून निघताच रस्त्यात अडवून तिघांनी पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. ही घटना गुरुवारी (दि.४) रात्री सव्वानऊच्या सुमारास हॉटेल शिदोरीमागे, देवळाई चौकीजवळ घडली. दरम्यान, काही लोकांनी पाठलाग सुरू केल्याने त्रिकुटाने दुचाकी रस्त्यातच सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासांत तिघांना बेड्या ठोकल्या.
दीपक रमेश कांबळे (२०), आकाश प्रकाश बोर्डे (२२, दोघेही रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) आणि कृष्णा ऊर्फ बाबू बुधराम यादव (१८, रा. नवनाथनगर, गारखेडा परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
फिर्यादी मोरजी खिमजी नोर (४२, रा. साई नक्षत्र अपार्टमेंट, बीड बायपास) यांचे अंबिका नावाने दुकान आहे. त्यांनी बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानातील सर्व कामकाज आवरून गल्ल्यातील दहा हजार रुपये बॅगमध्ये टाकले. दुकान बंद करून मोपेडने घराकडे निघाले. त्यांच्या पाठीमागून एक काळा रंगाचे दुचाकीवर तीन जण तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी मोरजी यांच्या खांद्याला लटकवलेली पैशाची बॅग मारहाण करून हिसकावून घेऊन गेले.
मोरजी हे मोपेडवरून खाली पडून जखमी झाले. त्यानंतर आरडाओरड केल्याने बाजूच्या एका बारमधून काही जण बाहेर पळत आले. लोकांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे पुढे गल्लीबोळात आरोपींना रस्ता न सापडल्याने त्यांनी दुचाकी रस्त्यात टाकून तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी धाव घेतली. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी पथकांना पाचारण केले. उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, जमादार योगेश गुप्ता, राजेंद्र साळुंके, शिरकांत काळे, मनोहर गीते, सुनील जाधव, जालिंदर गोरे, ऑस्कर खंडागळे, सोन पवार यांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दुचाकी व २६०० रुपये जप्त करून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, डीसीपी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
पाच दिवसांपासून रेकी
आरोपी कांबळे, बोर्डे हे दोघे वाहन चालक असून, यादव त्यांचा मित्र आहे. तिघांनी मागील पाच दिवसांपासून मोरजी यांच्या दुकानावर पाळत ठेवली होती. ते दररोज मोठ्याप्रमाणात रक्कम घेऊन घराकडे जात असल्याचे हेरले होते. बुधवारी तिघांनी फुल नशा केली. बोर्डेची दुचाकी घेऊन त्याच्या दोन्ही नंबर प्लेट काढून समोरच्या नावावर चिकटपट्टी लागली. त्यानंतर मोरजी याना लुटले.
त्या दिवशी पैसे कमी
मोरजी यांनी बुधवारी अनेक व्यापाऱ्यांना माल खरेदीची बिले देऊन टाकल्याने त्यांच्याकडे केवळ १० हजारच शिल्लक होते. त्यामुळे रेकी करणाऱ्यांना चार-पाच लाख हाती लागतील, अशी अपेक्षा होती.