

Attempts to recover deleted data from mobile phones
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात स्वतःचा फ्लॅट असताना आईसोबत हॉटेल अॅम्बेसेडरमध्ये तब्बल सहा महिने मुक्काम ठोकणाऱ्या तोतया आयएएस कल्पना भागवत प्रकरणात गुरुवारी (दि.४) पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकासह काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले. यासोबतच कल्पनाला पैसे देणाऱ्या यादीतील काहींना चौकशीसाठी बोलावून पोलिसांनी विचारणा केली. दरम्यान, कल्पना आणि तिचा अफगाणी मित्र अशरफ, साथीदार डिम्पी हरजाई या त्रिकुटाने नेत्यांनाही चुना लावल्याचे समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. आरोपींनी मोबाईलमधील डेटा डिलिट केला असल्याने तो परत मिळविण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
तोतया आयएएस कल्पनाचे दररोज नवे कारनामे समोर येत आहेत. पाकिस्तानात तिने तिचा अफगाणी मित्र मोहंमद अशरफ खीलच्या भावाला वाचविण्यासाठी फोन केल्याचेही समोर आले. दिल्लीतील साथीदार डिम्पी हरजाई सोबत मिळून त्यांनी अनेकांकडून पैसे उकळले. यामध्ये काही नेते आणि उद्य ोगपतींचा समावेश आहे. डिम्पी हा दिल्ली येथील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता.
त्यामुळे मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या तो संपर्कात आला. त्यातून त्याने ओळखी वाढवून जवळीक साधली. त्यादरम्यान त्याची कल्पनासोबत ओळख झाली. दोघांनी मिळून लोकांना चुना लावण्याचा कार्यक्रम सुरू केला. कल्पनाने आयएएस अधिकारी असल्याची बतावणी सुरू केली, तर डिम्पीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून दुकानदारी सुरू केली. तोतयेगिरी जोरात चालू झाल्यानंतर कल्पना दिल्ली येथून पुन्हा शहरात आली. तिने शहर व परिसरातील नामांकित व्यक्तींना जाळ्यात ओढण्यासाठी बोगस आयएएसची यादी तयार केली. त्यानंतर सहा महिन्यांपासून ती आईला घेऊन थेट हॉटेल अॅम्बेसेडरमध्ये राहण्यास गेली.
अधिक तपास सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड, पीएसआय अनिल नाणेकर, निवृत्ती गायके, सहायक फौजदार सुभाष शेवाळे, जमादार दीपक देशमुख करीत आहेत.
प्रकरणाची गुंतागुंत चक्रावून टाकणारी
तोतया आयएएस, केंद्रीय गृहमंत्र्यांचा स्वीय सहायक, अफगाणी अशरफ, पाकिस्तान कनेक्शन, खासदारांकडून पैसे लुबाडले, पद्मश्री मिळवून देण्याचे आमिष, केंद्रीय ऊर्जा खात्याची सचिव असल्याचा बनाव, पाकिस्तान, दुबई, अफगाणिस्तान येथील कल्पनाकडे ११ मोबाईल नंबर्स, दिल्लीत वावर, गुवाहाटी, राजस्थान भागात विमानाने सातत्याने प्रवास, पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिने मुक्काम, व्हिसा, पासपोर्ट मिळवून देण्यासाठी लॉबिंग असे अनेक पैलू या प्रकरणात समोर आल्याने आयबी, एटीएस आणि पोलिसांना प्रकरणाचा गुंता सोडवताना नाकीनऊ आले आहेत.