11.18 lakh voters for municipal elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने गुरुवारी (दि. २०) महापालिकेने सर्व १० झोन कार्यालयांमध्ये प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. १ जुलै २०२५ दिनांक ग्राहा धरून तयार केलेल्या प्रारूप यादीत ११ लाख १८ हजार ११८ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ७४ हजार ९३३, तर मतदार ५ लाख ४३ हजार ९९ महिला मतदार आणि ८६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. २०१५ सालच्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा साडेतीन लाख मतदार वाढले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या प्रसिद्धीसाठी महापालिकांना कार्यक्रम ठरवून दिला आहे. त्यानुसार गुरुवारी महापालिका निवडणूक विभागाने प्रारूप मतदार याद्या आपल्या सर्व १० झोन कार्यालयांमध्ये प्रसिद्ध केल्या. प्रभागनिहाय मतदारांची विभागणी करून या याद्या तयार केल्या आहेत. वॉर्डनिहाय याद्यांचे गड्ढे कमी होते. परंतु यंदा प्रभागनिहाय निवडणुका आहेत. अन् चार वॉर्डाचा एक प्रभाग असल्याने मतदार याद्यांचे गड्ढेही तेवढेच मोठे आहेत.
झोन कार्यालयांमध्ये २९ प्रभागांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध होताच अनेक इच्छुकांनी कार्यालयात याद्या पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती. मतदार याद्यांचे मोठमोठे गड्ढे पाहून अनेक इच्छुक अवाक् झाले.
दरम्यान, महापालिकेने ऑनलाईन मतदार याद्याही उपलब्ध केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ ही दिनांक ग्राह्य धरून महापालिकेला मतदार यादी उपलब्ध करून दिली आहे. त्याआधारे महापालिकेने प्रभागनिहाय विभागणी करून प्रारूप याद्या तयार केल्या आहेत.
यात ११ लाख १८ हजार ११८ मतदार असून, त्यात पुरुष मतदार ५ लाख ७४ हजार ९३३, तर महिला मतदार ५ लाख ४३ हजार ९९ इतके असून, तृतीयपंथी मतदार ८६ असल्याचे निवडणूक विभागप्रमुख तथा उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले. साधारणपणे ३० हजार ५० हजार दरम्यान मतदार संख्या प्रभागनिहाय आलेली आहे.
यादीसाठी प्रतिपेज २ रुपये
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्या ज्यांना पाहिजे त्यांना विकत घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने प्रतिपेज २ रुपये याप्रमाणे शुल्क निश्चित केले आहे. हे शुल्क निवडणूक विभागात भरणा केल्यानंतरच मतदार यादी मिळणार आहे. एका प्रभागाची मतदार यादी साधारणपणे १५०० ते २ हजार पानांची असल्याने किमान ३ ते ४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
तरच हरकती घेता येतील
मतदार याद्यांवर हरकत घेताना नमुना अ नुसार मतदार यादीत नाव नसेल तर किंवा चुकीच्या प्रभागात नाव समाविष्ट झाले असेल तरच हरकत घेता येईल. एकगठ्ठा हरकती स्वीकारल्या जाणार नाही. गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांना हरकत नोंदवता येईल. त्यानंतर हरकतींचा पंचनामा करून त्यात बदल केले जातील.