111 people from Marathwada stranded in Gulf countries
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर संपूर्ण आखाती देशांत युद्ध भडकले असून, यात मराठवाड्यातील तब्बल १११ नागरिक अडकले आहेत. विमानसेवा ठप्प झाल्याने या प्रवाशांना तूर्त भारतात परतणे कठीण झाले असले तरी हे सर्व जण पूर्णतः सुखरूप आहेत. राज्य व केंद्र प्रशासन त्यांच्या संपर्कात असून, नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी संयम राखावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय अडकलेले नागरिक
परदेशात अडकलेल्या १११ जणांमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक ३८ नागरिकांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ बीडचे २०, लातूर १३, धाराशिव १३, छत्रपती संभाजीनगर १०, परभणी १०, जालन्याचे ६ आणि हिंगोली जिल्ह्यातील एका नागरिकाचा समावेश आहे.
शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई, अबुधाबी, कतार आणि इस्रायलमधील हवाई क्षेत्र बंद करून विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यामुळे पर्यटनासाठी किंवा कामासाठी गेलेले भारतीय प्रवासी तेथेच अडकून पडले आहेत.
महाराष्ट्र शासनाने परदेशातील राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य शासन केंद्र सरकार आणि संबंधित दूतावासांशी सतत समन्वय ठेवून असून, प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दूतावासाकडून सुरक्षा ॲडव्हायझरी जारी
मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिराती (अबूधाबी) येथील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा मॲडव्हायझरीफजारी केली आहे. सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत दूतावासाच्या २४ X७ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.