मराठवाडा

बुलढाणा : आदित्य ठाकरेंची सभा अखेर आयोजकांनीच केली रद्द

Shambhuraj Pachindre

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : युवासेनाचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सोमवारी (दि. नोव्हेंबर) बुलढाण्यात गांधी भवन परिसरात आयोजिलेल्या सभास्थळाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ठाकरे गटात खळखळ झाली होती .आम्ही सभा तेथेच घेणार असा निर्धार करणाऱ्या ठाकरे गटाने संध्याकाळी अकस्मात माघार घेत आदित्य ठाकरे यांची बुलढाण्यातील नियोजित सभाच रद्द करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

आता ७ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे हे मेहकर येथील सभा आटोपून बुलढाण्याकडे येतील व मढ फाट्यावर शेतकऱ्यांशी संवाद साधून सिल्लोडकडे रवाना होणार आहेत. शिंदे गटाचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय या परिसराजवळ असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. असे कारण देत पोलीस प्रशासनाकडून नियोजित सभा स्थळाला परवानगी नाकारण्यात आली होती.

बुलढाणा शहरातील गांधी भवन हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जाहीर सभांसाठी ते प्राधान्याने निवडले जाते. त्यानुसार ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरें यांच्या सभेसाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतू या नियोजित सभेचा धसका विरोधी शिंदे गटाने घेतला असल्यानेच राजकीय दबावाखाली सभा नाकारण्याचे काम केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्यांनी केला. व सभा तेथेच घेऊ असा निर्धारही केला होता. बुलढाण्यामध्ये नियोजित सभास्थळ बदलण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

पोलिसांनी आयोजकांना दिलेल्या नकार पत्रात स्पष्टच म्हटले होते की, दि. ३ सप्टेंबर रोजी शहराजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम सुरू असतांना शिवसेनेचा ठाकरे गट व शिंदे गटात वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. ती घटना पाहता नियोजित सभास्थळ गांधी भवनजवळच शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे कार्यालय असल्याने पुन्हा या सभेमुळे 'त्या' घटनेची पुनरावृत्ती होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून गांधी भवन सभास्थळाला परवानगी नाकारण्यात येत आहे.

पोलिसांच्या भुमिकेवर ठाकरे गटाचे शिवसेना संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी आक्षेप घेतला होता. ३ सप्टेंबरचा राडा हा शिंदे गटाकडून झाला असतांना त्यांना प्रतिबंध करण्याऐवजी ठाकरे गटाच्या सभास्थळाला परवानगी नाकारणे म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार असल्याचे म्हटले होते. आदित्य ठाकरे यांची सभा आम्ही त्याच ठिकाणी घेणार असा निर्धार खेडेकर यांनी व्यक्त केला होता. मात्र संध्याकाळी माघार घेत आयोजक ठाकरे गटानेच आदित्य यांची सभा रद्द केली आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT