गौतम बचुटे
केज: निसर्गाच्या कोप आणि जीवनातील न थांबणाऱ्या संघर्षाने एका तरुण जिवाची आहुती घेतली आहे. केज तालुक्यातील आडस गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, रवि आकुसकर (वय २७) या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे अतोनात नुकसान आणि हाताला काम नसणे, या दुहेरी संकटातून आलेल्या नैराश्याने त्याला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.
रवि आकुसकर हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीसोबतच बांधकामांवर मिस्त्री म्हणून काम करत होता. कुटुंबाला आधार देण्याची त्याची धडपड सुरू होती. मात्र, यंदा अतिवृष्टीने शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. उत्पन्नाचा मुख्य स्रोत हिरावला गेला. त्यातच, ग्रामीण भागातील बांधकाम व्यवसायही ठप्प असल्याने हाताला काम मिळणेही दुरापास्त झाले.
शेतीचे नुकसान आणि काम नसल्याची चिंता यामुळे रवि नैराश्यात गेला. 'कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?' या विवंचनेत त्याने गुरूवारी (दि. ९ ऑक्टो.) रोजी रात्री आडस शिवारातील गायरान जमिनीत पळसाच्या झाडाला दोरीने गळफास लावून जीवनाचा शेवट केला.
या दुर्दैवी घटनेने आडस गावावर शोककळा पसरली आहे. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, अवघ्या तीन वर्षांचा लहान मुलगा, एक भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार आहे. या कुटुंबावर आणि चिमुकल्या मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारीच्या विवंचनेतून तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी ठोस सरकारी उपाययोजना करण्याची गरज या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.