Farmers ended life : दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
Sillod Two debt-ridden farmers end his life
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : दोन वेगवेगळ्या घटनेत दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यात एका शेतकऱ्याने गळफास घेतला. तर एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटना तालुक्यातील सावखेडा खुर्द व म्हसला खुर्द येथे शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी रात्री घडल्या. देविदास शामराव सोन्ने (३८, रा. सावखेडा खुर्द) व भाऊदास येडुबा साळुंके (५५, रा. म्हसला खुर्द) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
देविदास सोन्ने यांनी गळफास घेतला. तर भाऊदास साळुंके यांनी विषारी औषध घेतले होते. देविदास सोन्ने यांनी शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी राहत्या घरी कुणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार लक्षात येताच शेजारील नागरिकांनी तातडीने त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत भाऊदास साळुंके यांनी शनिवारी (दि. २७) मध्यरात्री विष घेतले.
ही बाब निदर्शनास येताच त्यांना नागरिकांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. या दोन्ही घटनांची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बिट जमादार विष्णू कोल्हे, कडुबा भाग्यवंत करीत आहेत.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
मृत देविदास सोन्ने, भाऊदास साळुंके यांच्यावर शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनांमुळे सावखेडा खुर्द, म्हसला खुर्द पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दोन्हीं शेतकरी कर्जबाजारी होते. या विवंचनेतून त्यांनी मृत्यूला कवटाळले, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

