Will make Beed district green: District Collector Johnson
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात एकाच दिवसात तीस लक्ष वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने हाती घेतले असून केवळ वृक्षारोपण न करता त्याचे संगोपनाचे 'सुक्षम' नियोजन जिल्हा प्रशासनाने हाती घेतले असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
बीड जिल्हा हा हरित जिल्हा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी यासाठी जिल्हा प्रशासनास महत्वाची जवाबदारी दिली असून या करिता जिल्ह्यातील सबंध प्रशासन खडबडून जागे होऊन पालकमंत्री यांनी दिलेली जबाबदार 'चोख' बजावण्यासाठी तत्पर झाला आहे. त्यातच जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी अत्यंत 'सुक्ष्म 'नियोजन केले असल्याने यात कुठलीही दप्तर दिरंगाई होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
तीस लक्ष वृक्षारोपणासाठी प्रशासनाने चक्क दोन महिन्या पासून याची तयारी केली असून बीड जिल्हा हा सर्व हिरवागार करण्यासाठी कामाला लागले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे सांगताना त्यांनी जिल्ह्याचे वनक्षेत्र हे विचारताच ते तेहतीस टक्के असायला हवे मात्र प्रत्यक्षात ते २.३३ टक्के एवढेच असल्याचे यावेळी उघड झाले, दरम्यान वन अधिकारी यांना किती कारवाया केल्या, किती अतिक्रमण काढले या बाबत प्रश्न विचारातच माहिती उपलब्ध झाली कि देतो असे जॉन्सन यांनी सांगून वेळ मारून नेली.
बीड जिल्ह्यात नेमके किती ऊसतोड कामगार आहेत या बाबत कुठेही अधिकृत अशी नोंद नाही त्यामुळे हे असंघटीत कामगार म्हणून आजवर ओळखले जात असून या कामगारांची नोंद घेण्याचे काम मिशन मोडबर घेतले असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन केवळ नोंद नाही तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करत असल्याचे यावेळी सांगितले.
आरोग्य सारथी हि संकल्पना आम्ही तयार केली असून ऊसतोड कामगारांच्या टोळ्यातील एका महिलेला आरोग्य विभागाच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षित करून तिच्या सोबत एका टोळीस एक मेडिकल किट देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथमोपचार साहित्य तसेच काही औषधी देखील असणार आहे. शिवाय काही मेजर दुखत असेल तर ती त्यांच्या गावातील अंगणवाडी सेविकेशी थेट संपर्क साधेल आणि तिथून पुढे बाकीची वैद्यकीय मदत त्यांना देण्याचे नियोजन केले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हि वृक्ष लागवड केली जाणार असून तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून ऊस तोडणीसाठी गेल्यावर त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा येणार नाही त्यासाठी आम्ही मिशन मोडवर काम करत आहोत. यात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा प्राथमिक गरजा, शिवाय त्यांच्या मुलांसाठी असणाऱ्या महामंडळाच्या इतर योजना ह्या आम्ही त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहोत असे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.