

Mahadev Munde Murder Case Inspection by SIT at the place of murder
बीड, पुढारी वृत्तसेवा: परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा २१ महिन्यांपूर्वी वन विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात खून झाला होता. या ठिकाणी एसआयटीच्या पथकाने भेट दिली. आयपीएस पंकज कुमावत यांनी तब्बल दोन तास या ठिकाणी थांबून घटनाक्रमाचा आढावा घेतला.
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा २१ महिन्यांपूर्वी धारदार शास्त्राचे वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपी मात्र अटक झालेले नाहीत. दरम्यान या प्रकरणात एसआयटी नियुक्त करावी या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती.
यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आयपीएस पंकज कुमावत यांचे नेतृत्वाखाली यासाठी नियुक्त करण्यात आली. या एसआयटीने आता तपासाला वेग दिला असून पंकज कुमावत यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता घटनास्थळी भेट दिली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ पंकज कुमावत यांच्यासह एस आयटीमधील अधिकारी तसेच स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थळी थांबून या घटनाक्रमाचा आढावा घेत होते.
परळी ते अंबाजोगाई रस्त्यावर तसेच वनविभागाच्या कार्यालयासमोर वरदळीच्या असलेल्या रस्त्यालगत ही घटना घडली होती. त्यावेळी नेमका काय प्रकार झाला असावा याचा अंदाज या पथकाकडून बांधला जात असून अगदी प्रारंभापासूनच त्यांनी आता हा तपास सुरू केल्याने या प्रकरणातील आरोपी लवकरच अटक होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासाबाबत पथकाकडून गुप्तता
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एसआयटीने तपास सुरू केल्यापासून अतिशय गुप्तता पाळली जात आहे. या प्रकरणात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असताना त्यापासून दूर राहत हा तपास केला जात असल्याचे दिसते.