Water discharge from Jayakwadi into Godavari basin
गेवराई, पुढारी वृत्तसेवा:
जायकवाडी धरणातील जलसाठा समाधानकारक झाल्याने शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी धरणाचे १८ - दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदी पात्रात ९,४३२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या जायकवाडी धरणात ९१% पाणीसाठा असून, वरून १६,१२३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून पाण्याची ही सतत वाढणारी आवक, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाचे परिणाम असून, पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षांत चौथ्यांदा धरण भरले असून, यंदा पावसाळा समाधानकारक ठरल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.
धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी जलसंपदामंत्री यांच्या हस्ते जलपूजन होणार असून, त्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू केला जाईल, यावेळी नदीकाठच्या राक्षसभुवन, गुळज, पांचाळेश्वर, सावळेश्वर, खामगाव, आगर नांदूर, गंगावाडी, राजापूर आदी गावांतील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धरणाचा जलप्रवाह नियमानुसार नियंत्रणात ठेवण्याचे काम सुरू असून, कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस यंत्रणा व पथके सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जायकवाडी धरण हे मराठवाड्याच्या पाणी पुरवठ्याचे प्रमुख स्रोत असून, धरणाच्या व्यवस्थापनात नेमकेपणा व पारदर्शकता ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या तळवाटीतील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. घराबाहेरील साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोटारी, गुरे-ढोरे, शेती साहित्य इ. सुरक्षित ठिकाणी हलवावे. विद्युत उपकरणांची काळजी घेण्यात यावी व नदी पात्रात कोणीही उतरू नये, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथक, पाणी पोलिस व स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.