

CM SIT Order in Mahadev Munde case
मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुण व्यावसायिक महादेव मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि भाजप नेते सुरेश धस यांनी केलेल्या मागणीनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करणार असून, या निर्णयामुळे परळीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संपूर्ण घटनाक्रम मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. महादेव मुंडे यांचे फोटो पाहिल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः भावूक झाले होते, असेही सांगण्यात आले. त्यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना धीर देत या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलीस महासंचालकांना फोन करून एसआयटी गठीत करण्याचे निर्देश दिले. "तुम्हाला जे अधिकारी हवेत, ते सर्व दिले जातील. सर्व आरोपींना तात्काळ अटक करा," असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
या प्रकरणात सुरुवातीपासूनच स्थानिक पोलिसांच्या तपासावर अविश्वास व्यक्त केला जात होता. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. आमच्या म्हणण्यानुसार, वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून आणि वाल्मिक यांच्या कार्यालयातून फोन गेले होते, असा थेट आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात काही गुप्त आरोपींची नावे देण्यात आली असून, त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणात काही पोलीस अधिकारीही सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांची नावेही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहेत.
या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते सुरेश धस यांनी यावर बोलताना अनेक जुन्या प्रकरणांना उजाळा दिला. "आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांची पदोन्नती झाली होती, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची बदली करण्यात आली. ते असते तर असे प्रकार घडले नसते," असे धस म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिपदावर बोलताना ते म्हणाले, "मला वाटत नाही की त्यांना मंत्रिपद मिळेल. तसे झाल्यास सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. अजून बापू आंधळे, गित्ते हत्या प्रकरण आणि बालाजी मुंडे हत्या प्रकरणाचा तपास बाकी आहे." गेल्या २१ महिन्यांत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुंडे कुटुंबाची भेट का घेतली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दबावाखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बाजूला करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, या निर्णयामुळे परळीकरांनी मोकळा श्वास घेतला आहे, असेही धस यांनी नमूद केले. आता पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी या प्रकरणाचा कसा तपास करते आणि यातील सत्य कधी बाहेर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.