नेकनूर : वै. व्यंकटस्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरु झालेल्या सप्ताहात कीर्तनाला निघालेल्या रिक्षाचालकासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्याची घटना नेकनूरमध्ये घडली. शनिवारी रात्री नेकनूरच्या बसस्थानकासमोर दुचाकीस्वाराला रिक्षाचा कट बसला या शुल्लक कारणातून दुचाकीस्वार रिक्षाचालकाला अडवून मारहाण करू लागला या रिक्षात बसलेल्या महिला मारहाण होत असल्याचे दिसताच काहींनी धाव घेतली यांनतर हा वाद पोलिस ठाण्यात पोहचला मात्र दोन्ही गट या ठिकाणी जमा झाल्याने ठाण्यासमोरच एकमेकांवर दगडफेक झाली. यानंतर सौम्य लाठीमार करत जमाव पांगवण्यात आला. तसेच बीड येथून पोलिसांची कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
नेकनूरमध्ये अलीकडे रस्त्यावर काही किरकोळ अपघात घडल्यास मोठ्या वादात रुपांतर होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. असाच प्रकार शनिवारी रात्री आठच्या दरम्यान बसस्थानकासमोर घडला. रिक्षाकडून दुचाकीला कट बसल्याचे कारणाने मोठे स्वरूप घेतले. या रिक्षात असलेल्या महिलांना मारहाण करण्यात येत असल्याचे दिसताच आजूबाजूच्या काहींनी यामध्ये हस्तक्षेप केला. मात्र यानंतर हा वाद वाढत पोलिस स्टेशनकडे गेला.
बघता बघता दोन्ही समाजातील लोकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली आणि वादाने मोठे स्वरूप प्राप्त करीत ठाण्यासमोर एकमेकांवर दगडफेक सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केज, बीड येथून पोलिसांची कुमक मागवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वै. व्यंकटस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी सकाळची अखंड हरीनाम सप्ताह ठप्पा राहिला असून या कीर्तनासाठी जाणाऱ्या रिक्षा चालकासह महिलेला मारहाण झाल्याच्या वृत्ताने नेकनूरमध्ये संतापाची लाट उसळली. यामुळे नेकनूर अशांत झाल्याचे पाहायला मिळाले.
केजचे पोलिस उपअधीक्षक व्यंकटराम हे रात्री नेकनूरमध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलिसांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकनूरचा रविवारचा आठवडी बाजार यामुळे बंद राहिला. नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये महिलेच्या फिर्यादीवरून तसेच पोलीस स्टेशन समोर दगडफेक झाल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे नोंदवण्यात आले. यातील १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी नेकनूर येथे भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे करीत आहेत.
सत्यता पडताळूनच गुन्हे दाखल करा
या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. रिक्षा आणि महिलांना मोठ्या जमावाने घेरल्याने त्या ठिकाणी मदतीसाठी धावून जाणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्यापूर्वी या घटनेची सत्यता पडताळणे महत्त्वाचे आहे. सीसीटीव्हीत दिसले म्हणून गुन्हेगार ठरवण्यापूर्वी वस्तुस्थिती प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे. जे खरंच यामध्ये सहभागी होते त्यांना गुन्हेगार ठरवले तर कोणाचा आक्षेप नसेल मात्र सहभाग नसताना केवळ त्या ठिकाणी ते समोर दिसतायेत म्हणून त्यांना यामध्ये गुन्हेगार ठरवले जाऊ नये असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. अशा घटना वारंवार का घडत आहेत याकडे पोलिसांनी लक्ष वेधणे गरजेचे आहे.
मारहाणीचा निषेध; नेकनूरचा आठवडी बाजार राहिला बंद
शनिवारी किरकोळ घटनेला मिळालेले स्वरूप पाहता रविवारचा आठवडी बाजार भरला नाही. व्यापाऱ्यांनी निषेध नोंदवत दुकाने उघडलीच नाहीत. तर काही प्रमाणात शेळ्या आणि जनावरे दाखल झाल्याने या ठिकाणचा बाजार काही काळ भरला. या ठिकाणी गोंधळ निर्माण होताच काहींच्या शेळ्या लंपास झाल्याची घटना घडल्याने या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली होती. रस्त्यावरील वाढते अतिक्रमण आणि त्यामुळे घडणाऱ्या अपघाताच्या घटना यामुळे नेकनूरच्या रस्त्यावर नेहमीच भांडणे होऊ लागली आहे. महिन्याभरापूर्वी अशीच घटना घडली होती. पोलीस ठाण्यासमोरच दोन समाजात एकमेकांवर दगडफेक झाल्याने पोलिसांनी फिर्यादी होत गंभीर गुन्हे दाखल केले. भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आता काय करायचे हा प्रश्न पडल्याने ते रस्त्यावरच काही काळ थांबले आणि परत फिरले.