Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Success
केज : मस्साजोगमध्ये आपल्या वडिलांची दिवसा ढवळ्या झालेली हत्या. या प्रकरणाच्या तपासात अपहरण, खंडणी, आरोपींकडून आलेल्या धमक्या, संतोष देशमुख यांच्या न्यायासाठीचा लढा आणि वडिलांच्या हत्ये नंतर घरातील प्रचंड तणावाच्या वातावरणात डोळ्यात पाणी, ह्रदयात आभाळा एवढे दुःख अशा मानसिकतेतून जात वैभवी देशमुख हिने परीक्षा दिली. परीक्षा देण्याची मानसिकता नसली तरी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन घट्ट करून तिने बारावी बोर्डाची परीक्षा दिली. आणि आज लागेलल्या निकालात वैभवीने विशेष प्राविण्यासह ८५. ३३ % गुण प्राप्त केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांना दि. ९ डिसेंबररोजी टोल नाक्यावर अडवून त्यांच्या गाडीच्या काचा फोडून अपहरण केले. त्या नंतर काही वेळातच त्यांना अज्ञात ठिकाणी घेवून जात अपहरणकर्त्यानी त्यांचे हाल हाल करून अत्यंत निर्घृणपणे खून केला. त्या नंतर त्यांचा मृतदेह दहीटना पाटी जवळ फेकून दिला होता.
दिवंगत देशमुख यांना दोन मुले असून कु. वैभवी देशमुख ही इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत होती. तर लहान विराज देशमुख हा इयत्ता पाचवीमध्ये लातूर येथे शिकत आहे. वैभवी ही लातूर येथे क्लास करीत होती. तिचा प्रवेश अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील कनिष्ठ विद्यालयात होता. वडिलांचे छत्र हरवले त्याचे दुःख आणि त्या नंतर महाराष्ट्रात निघालेले मोर्चे यामुळे दोन महिन्यांपासून वैभवीला क्लासला उपस्थित राहता आलेले नव्हते किंवा मन लागत नसल्याने तिला अभ्यास देखील करता आलेला नव्हता.
त्यातच दि. ११ फेब्रुवारी पासून महाराष्ट्र उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. घरातील सर्व दुःख म्हणजे मुलांसाठी वडील हे सर्वात मोठा आधार आणि बळ असते. त्या वडिलांची झालेली निर्घृण हत्या हे सर्व प्रसंग दिवस रात्र डोळ्या समोर असताना वैभवीने धीराने परीक्षा दिली. आज ऑनलाईन निकाल असल्याने वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यांच्या आशीर्वादाने निकाल चांगलाच येईल, असा मला विश्वास होता, असे तिने सांगितले.
ज्या वेळी परीक्षा सुरू झाली. त्यावेळी माध्यमां समोर आपल्या भावना व्यक्त करताना वैभवी म्हणाली होती की, पहिलाच पेपर होता. ज्या वेळेस माझे वडील तिच्या सोबत नव्हते. परीक्षेचे तीन तास म्हणजे खूप कठीण होते. आधी तर मानसिकताच नव्हती. पेपर सोडवत असताना तिला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते होती. पेपरला जाण्या अगोदर मनात कोलाहाल निर्माण झाला होता. त्यानंतर तिने ठरवलं की, नाही; पेपर द्यायलाच हवा. वडिलांचे जे स्वप्न होते. ते मला पूर्ण करायचं आहे
इंग्रजी- ६३,
मराठी- ८३,
गणित- ९४,
फिजिक्स - ८३,
केमिस्ट्री- ९१
बायोलॉजी - ९८
एकूण ६९९ पैकी ५१२ गुण मिळाले आहेत.
"आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत, याचे मला दुःख आहे. माझ्या वडिलांच्या खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.- वैभवी देशमुख