

बीड : पुढारी वृत्तसेवा
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला खंडणी हेच प्रमुख कारण असून, हा सगळा प्रकार वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच झाल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी केला. या प्रकरणाचा घटनाक्रम अगदी प्रारंभापासून न्यायालयासमोर मांडत केस ओपन करण्याची मागणी त्यांनी केली. यावर कराडचे वकील विकास खाडे यांनी आक्षेप घेत, आम्ही जे पुरावे न्यायालयाकडे मागितले होते ते अद्याप मिळाले नसल्याचे लक्षात आणून दिले. तसेच कराड यांच्यावर लावलेले आरोप आम्हाला मान्य नसल्याचे सांगत डिस्चार्ज अॅप्लिकेशन दाखल केले.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची बीड येथील न्यायालयातील पहिली सुनावणी बुधवारी (दि.२६) पार पडली. जिल्हा सत्र न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
सरकार पक्षाच्या वतीने उज्ज्वल निकम तर आरोपींच्या बाजूने विकास खाडे, अॅड. अनंत तिडके, अॅड. राहुल मुंडे यांनी बाजू मांडली. सुनावणीला सुरुवात होताच अॅड. उज्ज्वल निकम यांनी ८ ऑक्टोबर २०२४ ते ९ डिसेंबर २०२४ पर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. यामध्ये वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या २८ नोव्हेंबर आणि २९ नोव्हेंबरला बैठका झाल्याचा महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर मांडला. दरम्यान विष्णू चाटे आणि कराड यांच्यात तीन वेळा फोन झाल्याची माहिती सीडीआरमधून समोर आली असल्याचेही उज्ज्वल निकम यांनी यावेळी सांगितले.
मुंबईच्या २६/११ बॉम्ब हल्ल्याच्या केसचा संदर्भ देत केस ओपन करण्याची मागणी केली. यामध्ये आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे. या कंपनीने मस्साजोग शिवारात ३२ एकर जमिनीवर गोडाऊन केले. सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत. ८ ऑक्टोबरपासून खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली. यामध्ये आठ ऑक्टोबर रोजी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मीक कराड यांच्यासोवत कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली. कराड याने दोन कोटींच्या खंडणीची मागणी करून काम थांबवा, असे सांगितले. (या ठिकाणचे टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुरावे असल्याचेही निकम म्हणाले).
९ ऑक्टोबर २०२४ थोपटे यांनी कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांना फोनवरून दोन कोटींची खंडणी मागितल्याचे माहिती दिली. तसेच पोलिसांत तक्रार द्यावी का, अशी विचारणा केली. त्यावेळी अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका, असे सांगितले. त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही, असे सांगितले. हा सर्व युक्तिवाद तब्बल ३२ मिनिटे केल्यानंतर विकास खाडे यांनी आपले म्हणणे मांडले. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणातील सांगितलेल्या सर्व घटना, सीडीआर आणि लोकेशनबाबतचे पुरावे वारंवार सांगितले आहेत. परंतु त्यातील कोणतेही पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत. उज्ज्वल निकम यांनी कागदपत्रे देऊन केस पुढे घेऊन जाऊ शकतो, असे मत मांडले त्यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी केवळ आपण म्हणता म्हणून केस ओपन झाली असे होत नाही, असे म्हणत सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळण्याबाबत अर्ज केला व कागदपत्रांवर अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी खाडे यांनी न्यायालयासमोर केली.
कराड वर जे गुन्हे लावण्यात आले आहेत, ते आम्हाला मान्य नसल्याचे कराडच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचे डिस्चार्ज एप्लीकेशनही न्यायालयासमोर ठेवण्यात आले आहे. सरकारी वकिलांनी सादर केलेल्या सर्व पुरावे आणि कागदपत्रे मिळाल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. त्याशिवाय चार्जर फ्रेम करता येणार नाही. त्यामुळे पुरावे मिळण्यासाठी अर्ज केला असल्याचे ते म्हणाले. साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे जबाब, व्हिडिओ, सीडीआर मधील डिटेल, कोणतेही इलेक्ट्रॉनिक पुरावे देण्यात आले नव्हतें असे खाडे यांनी सांगितले. यावर कोर्टान पुढील सुनावणीची तारीख १० एप्रिल दिली आहे.