

बीड, पुढारी वृत्तसेवा: बीड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आज (दि.३१) सकाळी कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर काही कैद्यांना मारहाण देखील झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना देखील महादेव गीते, अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार हे बीड जिल्हा कारागृहात आहेत. याबरोबरच बनावट नोटा प्रकरणातील आरोपी अक्षय आठवले तसेच बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते यांच्यासह इतर काही आरोपी आहेत. सकाळी या कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला.
यावेळी सुदर्शन घुले व वाल्मीक कराड याला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत कैद्यांना दूर केले. आता या प्रकरणात कारागृह प्रशासनाने वरिष्ठांना माहिती कळवली असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई होणार असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.