Urgent help for farmers is the only solution MLA Sandeep Kshirsagar
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड मतदार संघातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून आ. संदीप क्षीरसागर यांनी नुकसान झालेल्या भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत हाच एकमेव या परिस्थितीतील उपाय असल्याचे प्रतिपादन आ. संदिप क्षीरसागर यांनी केले.
मागील काही दिवसांपासून बीड आणि शिरूर (का) सातत्याने पाऊस पडत असून अनेक महसूली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यापैकी चौसाळा जिल्हा परिषद गट, मांजरसुंबा पं. स.गण, लिंबागणेश पं.स. गण याठिकाणच्या गावातील झालेल्या शेतकरी बांधवांच्या पीक नुकसानीचे, सार्वजनिक मालमत्तेचे व इतर ठिकाणचे बीड विधानसभेचे आ. संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांनी बीड आणि शिरूर का तालुक्यातील सर्व महसूल मंडळात नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील आ. संदीप क्षीरसागर यांनी केली. बीड विधानसभा मतदारसंघात चौसाळा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनच्चे पीक अक्षरशः पाण्यात गेले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. आ.प क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील पिंपळगाव घाट येथील तेलपवस्ती नुकसान पाहणी केली. याठिकाणी बंधारा फुटल्याने शेतातील माती वाहून गेली आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच साखरे बोरगाव येथील पूल ढासळला आहे.
मोरगाव अंतर्गत जाधव वस्ती लिंबागणेशमधील बोरखेड रस्त्यावरील वाणी वस्तीवरील रस्त्याचा पूल वाहन गेला आहे. त्याठिकाणी देखील पाहणी करून नुकसान पाहणी वेळी प्रत्यक्ष प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना कसलाही विलंब न लावता सरसकट आर्थिक मदत द्यावी. शेतकरी बांधवांना न्याय मिळेपर्यंत प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.