

If the Nizami dynasty is overthrown, then how will the Hyderabad Gazetteer be implemented?
केज, पुढारी वृत्तसेवा ज्या निजामी सत्तेचा अंत भारत सरकारने केला, ती निजामी सत्ता अखंड भारतात विलीन केली... मग त्याच निजामाचे हैदराबाद गॅझेटियर राज्य सरकार मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गात समावेशासाठी कसे लागू करू शकते? असा जळजळीत सवाल प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
केज येथे शुक्रवारी सकल ओबीसींचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केले. मोर्चेकऱ्यांच्या घो-षणा, हातात उंचावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, गोपीनाथ मुंडे, बसवेश्वर महाराज, अहिल्यादेवी होळकर, बाळासाहेब आंबेडकर यांचे फोटो यामुळे संपूर्ण केज शहर ओबीसींच्या घोषणांनी दणाणून गेले होते.
मोर्चा भवानी चौकातून निघून शिवाजी चौक, पंचायत समिती मैदान येथे जाहीर सभेत परिवर्तित झाला. यावेळी प्रा. हाके म्हणाले, मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी काढलेला जी. आर. हा बेकायदेशीर आहे. या जी.आर. मुळे ७ ओबीसी बांधवांचे बळी गेले आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा होत असताना निजामाचे पुरावे ग्राह्य धरले जातात; हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार जातीवादी आहेत. ते ओबीसींचा आवाज दाबू पाहत आहेत. पण आम्ही गप्प बसणार नाही.
नवनाथ वाघमारे म्हणाले, की मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यायला आम्ही विरोध करत नाही. पण त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश हा आमच्या राजकीय हक्कांवर गदा आणणारा आहे. पंकजा मुंडे यांनी यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आम्ही करतो. वाघमारे यांनी आमदार रोहित पवार यांचा उल्लेख 'शेंबड्या', तर मनोज जरांगे यांचा उल्लेख 'खरजुला' म्हणून करत संविधानाचे नाव घेता, पण बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का लावत नाही, हा तुमचा दुटप्पीपणा आहे, असा सवाल उपस्थित केला.