Two leopards staying in the Suleman Deola area
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावात गेल्या आठ दिवसांपासून दोन बिबट्यांनी मुक्काम ठोकल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. हे बिबटे दर संध्याकाळी गावाच्या पश्चिम भागातील सर्व्हे क्रमांक ५५ मधील डोंगरउतारावर दिसत असून, त्यांनी आतापर्यंत काही कुत्रे व शेळ्यांचा बळी घेतल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
गावालगतच वस्ती असल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. हे बिबटे केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्या देखील वस्तीच्या जवळ बिनधास्त वावरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेची माहिती वारंवार वनविभागाला दिली असली तरी अद्याप विभागाकडून ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मानवी जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी मागणी सुलेमान देवळा येथील समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके यांनी केली आहे. ग्रामस्थांनी वन विभागाने पिंजरे लावून तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी केली असून, या घटनेमुळे सुलेमान देवळा व परिसरातील शेतकरी वर्ग आणि नागरिक भयभीत आहेत.