

गौतम बचुटे
केज : रात्रीच्या वेळी दुकानात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून आतील टीव्ही, पंखे व मिक्सर असे ६३ हजार ४०० रु. च्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरीला गेल्या आहेत.
या बाबतची माहिती अशी की, बोरगाव तालुका केज येथील औदुंबर दत्त शिंदे यांचे श्री बालाजी इंटरप्रायजेस नावाचे इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीचे मस्साजोग येथे दुकान आहे. ३ नोव्हेंबर रोजी त्यांनी रात्री ८:३० वाजता ते रोजच्याप्रमाणे दुकान बंद करून व दुकानाला कुलूप लावून त्यांच्या गावी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता ९:०० वाजता त्यांनी दुकान उघडले असता त्यांना काउंटरवर हिशोबाच्या वह्या आणि पेन व इतर वस्तू या अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून आल्या. त्यांनी दुकानाची व आतील मालाची पाहणी केली असता दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा कापून ५ एलइडी टीव्ही, ३० सीलिंग फॅन आणि दोन मिक्सर असा एकूण ६३ हजार ४०० रु. चाक माल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
बुधवारी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी औदुंबर शिंदे यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ६११/२०२५ भा. न्या. सं. ३०५(ए), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस जमादार फुलचंद सानप हे तपास करीत आहेत.