Two and a half lakh trees will be planted in Dharur taluka
धारुर, पुढारी वृत्तसेवा : एक दिवस वृक्ष लागवड मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. ही मोहीम राबवण्यासाठी तालुकास्तरावर वृक्ष लागवडीचे विविध कार्यालयाला उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात ही लागवड करण्यात येणार असून धारूर तालुक्यामध्ये २ लाख ६८ हजार ८५६ झाडांची लागवड होणार आहे. वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांची नोंद क्यूआर कोड द्वारे करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी सार्वजनिक तसेच वनविभागाच्या जमिनीमध्ये वृक्ष लागवडीची मोहीम ऑगस्ट महिन्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी तालुकानिहाय उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असून सचिव हे वनपरिक्षेत्र अधिकारी आहे. या समितीकडून २५ जुलै रोजी बैठक घेण्यात आली असून कार्यालय निहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टामध्ये सर्व शासकीय कार्यालय तसेच ग्रामपंचायतचाही समावेश आहे. एक दिवस वृक्ष लागवडीसाठी २९ व ३० जुलै दरम्यान खड्डे खोदण्यात येणार होते.
तसेच योग्य स्थळाची निवड ही संबंधित कार्यालयाने करायची आहे. झाडांची संख्या मोजण्यासाठी क्यूआर कोड प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ज्या कार्यालयाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यांनी जिओ टॅगिंग नोंदणी करावयाची आहे. लागवडीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी अधिकारी पदाधिकारी स्थानिक नागरिक, माध्यमिक शाळा, कॉलेज विद्यार्थी, बचत गट, महसूल विभागातील तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, खासगी कारखाने एनजीओ आदींचा सहभाग घेण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरणाकडून रोपांची उपलब्धता करण्यात येणार आहे. लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची किंवा क्यूआर कोड द्वारे गणनासंदर्भात प्रणाली विकसित करून गिनीज बुकात नोंद होण्यासंदर्भात त्यांनी कारवाई करायची आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
एक दिवस वृक्ष लागवडीमध्ये वनपरिक्षेत्र कार्यालयात १ लाख १२ हजार, पंचायत समिती कार्यालय ५८१५६ नगरपालिका, १३ हजार, पोलिस ठाणे १हजार, कृषी कार्यालय १६हजार, गटशिक्षणाधिकारी कार्यालय ६७००, इको बटालियन धारूर ५० हजार, तहसील कार्यालय १००००, रेशीम उद्योग कार्यालय २००० असे एकूण २ लाख ६८ हजार ८५६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.