Twelve projects in Beed district filled, agricultural irrigation issue resolved
बीड, पुढारी वृत्तसेवा मे महिन्याच्या अखेरीस बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यानंतर जून महिन्यातही जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असल्याने प्रकल्पीय पाणीपातळी वाढत आहे. सध्या बीड जिल्ह्यातील दोन मध्यम व १० लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
बीड जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्यांना दर दोन वर्षाला दुष्काळाचा सामना करावा लागतो. यावर्षी मात्र मे महिन्याच्या अखेरपासून जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे शेतकरी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहत होते.
यानंतर जूनच्या प्रारंभीही पावसाचा जोर कायम राहिल्याने आता जिल्ह्यातील बारा लघु आणि मध्यम प्रकल्प तुडुंब झाले आहेत. याबरोबरच मांजरा व माजलगाव या मोठ्या प्रकल्पांमध्ये देखील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.
पूर्ण क्षमतेने भरलेले मध्यम प्रकल्प बिंदुसरा व कडा प्रकल्प, पूर्ण क्षमतेने लघु प्रकल्प करचुंडी, जळगाव, मुंगेवाडी, धामणगाव, डोकेवाडा, लोकरवाडी, भायाळा, सिद्धवाडी, खटकळी, डोमरी.