

केज :- केज तालुक्यातील लव्हुरी येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या डोक्याचे कात्रीने केस कापून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व बोटातील अंगठ्या काढून घेत तिला जिवे मारून प्रेताचे तुकडे करून विहिरीत फेकून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
केज येथील रशिदा उस्मान शेख या महिला मागील काही महिन्यां पासून त्यांची वृद्ध आईची देखभाल करण्यासाठी लव्हुरी येथे राहत आहेत. दि. १५ जून रोजी रशिदा शेख या त्यांच्या बहिणीच्या घरीहून येत असताना हमीद पठाण व राजू हमीद पठाण हे दोघे तेथे अचानक आले. हमीद पठाण याने त्यांना काही न बोलता खाली पाडून लाथा-बुक्याने मारहाण करून पोटात व कमरेत लाथा मारल्या.
राजू पठाण याने त्याचे हातातील हिरव्या रंगाच्या कात्रीने त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याचे सोन्याचे सेव्हन पीस कापुन घेत गळा दाबला आणि कात्रीने डोक्याच्या केसाची वेणी कापून टाकली. तसेच सहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या सुद्धा काढून घेतल्या. त्या नंतर त्याने खून करुन, तुकडे तुकडे गोणीत भरुन विहिरीत टाकून देण्याची धमकी देत शिवीगाळ केली.
या प्रकरणी रशिदा शेख यांच्या तक्रारी वरून हमीद पठाण व राजू हमीद पठाण यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा गु. र. नं. ३१०/२०२५ भा. न्या. सं. ११९(१), ३५६(२), ११२(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहे.