केज : केज तालुक्यातील नांदूरघाट शिवारात अज्ञात चोरट्यांनी तीन शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी मोटारी, स्टार्टर व केबल वायर असा एकूण 75 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमोल सखाराम जाधव यांच्या मालकीची सर्वे क्रमांक 400 व 397 मधील शेतातील विहिरीवरून 29 जुलैच्या रात्री चोरट्यांनी दोन पाणबुडी मोटारी, सौरऊर्जा पंपाचे सुमारे 630 फूट केबल वायर आणि स्टार्टर असा 37 हजार 950 रुपयांचा ऐवज लंपास केला.
याचवेळी शेजारील शेतकरी अनिल बळीराम गपाट यांच्या विहिरीवरील व बोअरवरील 100 फूट केबल वायर आणि 14 हजार रुपये किंमतीची पाणबुडी मोटार, तसेच सौरभ अनिल कोटेचा यांच्या विहिरीवरील पाणबुडी मोटार व सोलर मोटारचे 150 फूट केबल वायरही चोरट्यांनी चोरून नेले.अमोल जाधव यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार उमेश आघाव पुढील तपास करीत आहेत.