The power to bring about a change of power within the Banjara community
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : देशात सुमारे १२ कोटी बंजारा बांधव आहेत. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांपैकी जवळपास ७० मतदारसंघांत प्रती ५० हजारांहून अधिक बंजारा मतदार आहेत. समाज संघटित राहिला तर मोठे राजकीय परिवर्तन घडविण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन मंत्री संजय राठोड यांनी केले.
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या कृषी व ग्रामीण विकासाचा भक्कम पाया रचणारे माजी मुख्यमंत्री तथा महानायक स्व. वसंतरावजी नाईक यांच्या ११३ व्या सार्वजनिक जयंतीनिमित्त वडवणी येथे रविवारी (दि. २६) भव्य बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नगरपंचायत कार्यालयासमोरील बचत गट भवन परिसरात पार पडलेल्या या मेळाव्याला हजारो समाजबांधव, महिला, युवक, संत-महंत, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. समाजाच्या ऐक्याचे, संघटनशक्तीचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा हा मेळावा वडवणीच्या इतिहासातील संस्मरणीय सोहळा ठरला.
मृद व जलसंधारण विभागाचे कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड यांचे शहरात आगमन होताच नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार, हलकीचा गजर आणि "संत सेवालाल महाराज की जय "च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आलेल्या भव्य मोटारसायकल रॅलीत शेकडो युवक सहभागी झाले.
शहरातील प्रमुख मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बंजारा समाजाच्या कलाकारांनी पारंपरिक लेंगी गीतांचे सादरीकरण करून समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. संजय राठोड यांनी वडवणी शहर लगतच्या तांड्याच्या पाणीप्रश्नासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सोनाखोटा धरणातून नियोजन करण्यात येईल. नागरिकांना कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी शासनस्तरावर कोणतीही कमी पडू देणार नाही." समाजाच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत त्यांनी हक्काची जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपयांच्या निधीतून भव्य समाज भवन उभारण्याचे आश्वासन दिले.
"समाजाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. आपली संस्कृती, परंपरा आणि वारसा जपण्यासाठी राज्यात शेकडो बंजारा विरासत उभारण्याची गरज आहे." वसंतराव नाईक संशोधन केंद्राची मागणी शासनाने पूर्ण केल्याचा उल्लेख करत त्यांनी समाजाच्या इतिहासाचे संशोधन आणि जतन करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगितले. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी पालकांना आवाहन केले, आज स्पर्धेचे युग आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
कितीही कष्ट करा, पण आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण द्या. शिक्षणामुळेच समाज सक्षम आणि स्वाभिमानी बनेल. बंजारा समाजाच्या लोकसंख्येचा उल्लेख करत ते म्हणाले, आवाहनही त्यांनी केले. या मेळाव्यास महंत यशवंत महाराज (उमरगड), महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज आणि महंत शेखर महाराज (पोहरागड) यांच्यासह अनेक संत-महंतांची उपस्थिती लाभली.
नोकरी मिळाली नाही म्हणून राजकारणात !
आपल्या राजकीय प्रवासाबाबत ते म्हणाले, "मला नोकरी मिळाली नाही म्हणून राजकारणात आलो; मात्र राजकारण हे केवळ पदासाठी नसून समाज सेवेसाठी आहे. काम करताना मी कधीही छोटा-मोठा असा भेदभाव केला नाही. प्रत्येकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न केला." मंत्रीपदाची शपथ घेतानाचा प्रसंग सांगताना त्यांनी सांगितले, "मी मंत्रीपदाची शपथ 'संत सेवालाल महाराज की जय' असा जयघोष करूनच शपथ घेतली. पोहरादेवीच्या महंतांना समाजासाठी सातत्याने काम करण्याचे वचन दिले होते. त्या दिवसापासून समाजाच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहे." बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास जतन करण्यासाठी राज्यभर 'बंजारा विरासत' उभारण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी सांगितले.