

Sawarkheda-Warkheda Viro road is in a bad condition
मुकेश भारद्वाज
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा-वरखेडा विरो हा मुख्य रस्ता गेल्या चार वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठ-मोठ्या खड्यांमुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या मार्गाचा वापर दररोज शेकडो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण तसेच जाफराबाद शहरात शिक्षण व इतर कामांसाठी ये-जा करणारे नागरिक करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.
या रस्त्यावर अनेक किरकोळ अपघात घडले असून, भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अन्यथा आंदोलन
सावरखेडा-वरखेडा विरो रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.