The Nagpur GST scam has a 'Beed connection'.
बीड, पुढारी वृत्तसेवा :
नागपूर येथील गाजलेल्या जीएसटी घोटाळ्याचे धागेदोरे आता बीडपर्यंत पोहोचले आहेत. बनावट जीएसटी बिले तयार करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी शनिवारी (दि. 3) रात्री बीडमध्ये धडक कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उमेर आणि शकील (पूर्ण नाव समजू शकले नाही, रा. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे जीएसटी बिले तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर येथील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना यात बीडमधील काही व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक शनिवारी रात्री बीडमध्ये दाखल झाले. शिवाजीनगर, पेठ बीडमध्ये शोधमोहीम नागपूरच्या पथकाने बीडमधील शिवाजीनगर आणि पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोधमोहीम राबवली. यावेळी उमेर आणि शकील या दोघांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना अटक करून हे पथक नागपूरकडे रवाना झाले आहे.
साखळी उघड होणार?
जीएसटी घोटाळ्याची ही साखळी मोठी असण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांच्या चौकशीतून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता असून, बीडमधील आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.