

केज :- सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे याने भीमा कोरेगाव येथील येथील १ जानेवारी रोजी शौर्य दिनाच्या निमित्ताने स्टेटस ठेवले होते.
त्याच्या मोबाईलच्या इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या अकाउंटच्या स्टेटसला जाणीवपूर्वक भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या निमित्ताने एका समाजाच्या भावना भडकाविण्याच्या वाईट उद्देशाने आणि दोन समाजात व दोन जातीत तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याच्या उद्देशाने एक आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला होता.
त्यामुळे केज येथील दलीत चळवळीतील विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष योगेशभाई गायकवाड, लखन हजारे, निलेश साखरे, बाळासाहेब ओव्हाळ, अशोक गायकवाड, तात्या गवळी, प्रदीप गायकवाड, गौतम बचुटे, समाधान बचुटे, बाबुराव गालफाडे, लिंबराज गायकवाड, समाधान बचुटे आणि दलीत चळवळीतील कार्यकर्त्यानी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची भेट घेतली आणि दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष योगेशभाई गायकवाड यांच्या फिर्यादी वरून रोहन गलांडे यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ०७/२०२६ भा. न्या. सं. १८६(१), २९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल मुरकुटे हे तपास करीत आहेत
" सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने पोस्ट व्हायरल केल्यास कठोर कारवाई कारवाई केली जाईल. "
---स्वप्नील उनवणे, पोलिस निरीक्षक, केज